
नादुरी / वणी , 26 मार्च (हिं.स.) महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवाला रामनवमीच्या शुभमुहूर्तावर आज उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. पहाटेपासूनच गडावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.उत्सवाच्या प्रारंभी विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा यांसह देवीच्या महावस्त्र व अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गड परिसर “जय माता दी”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
सकाळची पंचामृत महापूजा नाशिकचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. राहुल एन. रोकडे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. यावेळी संस्थानच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती के.के. पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी, कळवण कश्मिरा संखे, कळवण तहसीलदार रोहिदास वारुळे, विश्वस्त अॅड. ललित निकम, यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
चैत्रोत्सव काळात भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी तीन ठिकाणी उद्बोधन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात ३११ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून महाराष्ट्र राज्य पोलीस व सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन सेवा व प्रथमोपचार केंद्र २४ तास कार्यरत ठेवण्यात आले आहे.
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था, तसेच शिवालय तीर्थ येथे मोठ्या प्रमाणात निवारा शेड (मंडप) कार्यात करण्यात आला आहे, ई-टॉयलेटची व्यवस्था, पाणपोया, चप्पल स्टँड यांची सोय करण्यात आली आहे. अखंडित वीजपुरवठ्यासाठी तीन जनरेटरची व्यवस्था करण्यात आली असून गड परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
यात्रेच्या कालावधीत (दि. २६ मार्च ते ३ एप्रिल) गडावर खाजगी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून नांदुरी येथून एसटी बसद्वारे भाविकांची ने-आण करण्यात येत आहे. तसेच गडापासून एक किलोमीटर अंतरावर सालाबाद प्रमाणे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे.
दरम्यान, चैत्रोत्सवाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनीही आज सप्तशृंगी देवीची आरती करून दर्शन घेतले. रामनवमी तसेच त्यांच्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त देवीचे दर्शन घेण्याचा योग आल्याचे त्यांनी सांगितले.
चैत्रोत्सव यशस्वी करण्यासाठी विश्वस्त संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, प्रकाश पगार, यशवंत देखमुख, प्रशांत निकम, सुनील कासार, विश्वनाथ बर्डे, विजय भवरे, नारद आहिरे, शाम पवार, मुरलीधर गायकवाड, मुरलीधर गावित, यांच्यासह सर्व विभागांचे कर्मचारी व स्वयंसेवी संस्था सक्रियपणे कार्यरत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV