दुष्ट शक्तीचा नाश व धर्म रक्षणासाठी प्रभू रामाचा जन्म - दिवेगावकर महाराज
लातूर, 26 मार्च (हिं.स.)। भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान, त्याग आणि समर्पणाचे मूर्तीमंत प्रतीक, समस्त भारतीयांचे श्रध्दास्थान असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मसोहळ्याच्या निमित्ताने सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले भारतीय
श्रीराम जन्मोत्सव


लातूर, 26 मार्च (हिं.स.)।

भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान, त्याग आणि समर्पणाचे मूर्तीमंत प्रतीक, समस्त भारतीयांचे श्रध्दास्थान असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मसोहळ्याच्या निमित्ताने सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले भारतीय संस्कृती दर्शन 'श्रीराम' रथ यात्रा सोहळा रामनवमी गुरुवार रोजी मोठ्या उत्साहाच्या आणि भक्तिमय वातावरणात लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर (रूई) येथे पार पडला. या सोहळ्यास रामेश्वर आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भाजपा नेते लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड हे आवर्जून उपस्थित होते.

प्रभू श्रीराम जन्मसोहळ्याच्या निमित्ताने गुरुवारी सकाळी पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का दादाराव कराड यांनी श्रीराम मंदिरास अर्पण केलेल्या सुंदर, रेखीव व वैशिष्ट्यपूर्ण अशा भारतीय संस्कृती दर्शन - श्रीराम रथाची, रामेश्वर गावत ग्रामप्रदक्षिणा झाली. या रथयात्रेत वाजंत्रीसह विविध भजनी मंडळी, टाळकरी, असंख्य भव्य ध्वज हातात घेऊन प्रभू रामचंद्राचा जयघोष करीत भाविक भक्त सहभागी झाले होते.

मोठ्या उत्साहाच्या आणि भक्तीवातावरणात निघालेल्या या रथयात्रेत महिला पुरुष सर्व स्तरातील नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. या रथ यात्रेचा समारोप प्रभू श्रीराम मंदिरात झाला याप्रसंगी ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगावकर यांचे कीर्तन झाले. कीर्तनातून बोलताना हरिहर महाराज यांनी प्रभू श्रीराम हे विष्णूचा सातवा अवतार होते. प्रभू रामाचे ईश्वर म्हणजेच रामेश्वर असल्याचे सांगून त्रेतायुगात दुष्टशक्तीचा नाश करण्यासाठी आणि धर्मरक्षण करण्यासाठी मानवाला सन्मार्गावर आणण्यासाठी जन्म झाला. प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम असून त्यांचे जीवन सत्य, त्याग, कर्तव्य, एक वचनी, एक पत्नी असा नैतिक मूल्याचा आदर्श आहे असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande