परभणी रेल्वे स्थानकावर चोरीचे दोन आरोपी अटकेत
परभणी, 26 मार्च (हिं.स.)। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत परभणी रेल्वे स्थानकासह परिसरात यशस्वी कारवाया करत दोन चोरीच्या आरोपींना अटक
परभणी रेल्वे स्थानकावर चोरीचे दोन आरोपी अटकेत; आरपीएफची ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत कारवाई


परभणी, 26 मार्च (हिं.स.)।

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत परभणी रेल्वे स्थानकासह परिसरात यशस्वी कारवाया करत दोन चोरीच्या आरोपींना अटक केली आहे. पहिल्या घटनेत, दि. २५ मार्च रोजी सुमारे दुपारी १२:३० वाजता परभणी (PBN) रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील RMS कार्यालयाजवळ प्रवाशांच्या सामान चोरीच्या घटनांवर देखरेख सुरू असताना सहाय्यक उपनिरीक्षक अमोल वावळे यांनी एका संशयिताला प्रवाशांचे सामान चोरण्याचा प्रयत्न करताना रंगेहाथ पकडले. अजय (रा. बुरहानपूर, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव असून त्याला तत्काळ शासकीय रेल्वे पोलिस (GRP), परभणी यांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ६७/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ११० व ११७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत, त्याच दिवशी हनुमान मीणा व RPSF चे कॉन्स्टेबल आर. के. मीणा आणि के. के. मीणा हे ट्रेन क्रमांक १७२०८ एक्सप्रेसमध्ये छत्रपती संभाजीनगर–लासूर दरम्यान गस्त घालत असताना S-08 डब्याजवळ एक संशयित व्यक्ती आढळली. चौकशीदरम्यान आकाश (वय २७, रा. अहमदनगर) याच्याकडे ₹२७,९९९ किंमतीचा Vivo मोबाईल आढळून आला. सखोल तपासात त्याने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपी व जप्त मोबाईल GRP, छत्रपती संभाजीनगर यांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५(क) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवायांमुळे नांदेड विभागातील आरपीएफची सतर्कता आणि गुन्हे रोखण्याची क्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे. दरम्यान, प्रवाशांनी सतर्क राहून संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना कळवावे किंवा मदतीसाठी आरपीएफ हेल्पलाईन क्रमांक १८२ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande