
छत्रपती संभाजीनगर, 26 मार्च (हिं.स.) । डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल सत्राच्या परीक्षा ७ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. या परीक्षेत सुमारे २ लाख ८० हजारपेक्षा अधिक विद्यार्थी २४० परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.
विद्यापीठ प्रशासनाने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी आगामी उन्हाळी परीक्षा एकाचवेळी घेण्याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन केली आहे. यासह विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभाग सत्र परीक्षेची तयारी करत आहे.
परीक्षा ७ एप्रिलपासून सुरू होणार असून, पहिल्या टप्प्यात रिपीटर विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर १६ एप्रिलपासून नियमित परीक्षा सुरू होतील. परीक्षा केंद्रांसह बैठक व्यवस्थेचे नियोजनही पूर्ण केले जात आहे.
विद्यापीठाने परीक्षा दरम्यान खबरदारीसाठी प्राचार्यांना पत्र पाठवून विविध सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयांकडून माहिती ऑनलाइन पद्धतीने मागविली जात असून, ही माहिती महाविद्यालयांना ३० मार्चपर्यंत विद्यापीठाला सादर करावी लागणार आहे.
यासोबत, विद्यापीठाने ‘क्यूपीडीएस’ प्रणालीसाठी फक्त प्राचार्य आणि परीक्षा केंद्र प्रमुखांनाच युजरआयडी व पासवर्ड भरण्याचा अधिकार दिला आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis