
रत्नागिरी, 26 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील अत्यंत खराब अवस्थेत असलेल्या रस्त्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पालिकेला निवेदन सादर केले आहे.
चर्मलय चार रस्ता ते क्रांतीनगर, कोकण नगर आणि कीर्ती नगर या परिसरातील रस्ते गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत खराब झाले असून नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याला विशेष महत्त्व असून तो विमानतळ, औद्योगिक क्षेत्र तसेच परिसरातील अनेक गावांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे.
रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे स्थानिक रहिवाशांना दररोज त्रास सहन करावा लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे संतप्त झालेल्या नौसीन काझी यांनी “नगरपालिका रस्ता दुरुस्त करू शकत नसेल, तर मी स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त करीन. माझ्याकडे साधनसामग्री नसताना मी करू शकतो, तर पालिकेकडे सर्व यंत्रणा असूनही काम का होत नाही?” असा सवाल उपस्थित केला.
यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. गारवे आणि प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते एजाज इबजी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी