
बीड, 26 मार्च (हिं.स.)।
जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे धक्कादायक वास्तव समोर आले असून मागील १४ महिन्यांत तब्बल ३०५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. यापैकी ४८ प्रकरणांत शेतकरी कुटुंबे मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आली असून २० प्रकरणांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली असून यात गेवराई आणि आष्टी तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी १० आत्महत्या झाल्या आहेत. कर्जबाजारीपणा आणि नापिकीच्या तणावाखाली असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत सरकारी कर्मचारी 'नशेतून आत्महत्या' झाल्याचा अहवाल देऊन मोकळे होतात, असा गंभीर आरोप केला जात आहे. यामुळे अनेक पीडित कुटुंबे शासनाच्या एक लाख रुपयांच्या मदतीपासून वंचित राहत आहेत. प्रशासन या गंभीर मानवी प्रश्नावर कधी ठोस उपाययोजना करणार, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis