व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज - राहुल नार्वेकर
मुंबई, 26 मार्च, (हिं.स.)। व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटकांनी जबाबदारी स्वीकारून एकत्रित प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रति
मुंबई


मुंबई, 26 मार्च, (हिं.स.)। व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटकांनी जबाबदारी स्वीकारून एकत्रित प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सन २०२० ते २०२५ या पाच वर्षातील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर बोलत होते.

कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे तसेच विभागाच्या आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, कीर्तनकार सत्यपाल महाराज उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, समाजात परिवर्तन घडविण्याचे काम सामाजिक न्याय विभाग प्रभावीपणे करत असून, लोकोपयोगी उपक्रमांमुळे सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे. या सोहळ्यात १०० हून अधिक व्यक्ती आणि १३ संस्थांचा गौरव होत असून, हे कार्य राष्ट्रनिर्मितीला बळ देणारे आहे, असे त्यांनी नमूद केले. व्यसन ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या आहे. व्यसनामुळे आर्थिक नुकसान, उत्पादकतेत घट, आरोग्य व्यवस्थेवर ताण, गुन्हेगारीत वाढ, कुटुंबव्यवस्थेचे विघटन आणि शिक्षणातील गळती वाढते, असेही त्यांनी सांगितले.

भारत हा जगातील सर्वात तरुण देश असून २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे ध्येय आहे. या पार्श्वभूमीवर युवाशक्तीचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराप्रमाणे समाजात बदल घडवायचा असेल तर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध शांत न राहता सक्रिय भूमिका घेण्याची गरज आहे. समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पुढील काळात अधिक व्यापक उपक्रम राबविले जातील, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष अॅड नार्वेकर यावेळी व्यक्त केला.

व्यसनमुक्त व गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्त व गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प आहे. व्यसनामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होतात आणि तरुण पिढीवर त्याचे गंभीर परिणाम होतात. ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी अडकू नये यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. “व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा आहे,” असा संदेश देत नागरिकांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

व्यसनमुक्तीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान समाजासाठी प्रेरणादायी

– सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजातील अंधारात प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखी भूमिका बजावली आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येतात, मात्र या क्षेत्रात कार्य करणारे लोक समाजासाठी आशेचा किरण आहेत. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात काय करावे आणि काय टाळावे हे स्वतः ठरवायचे असते, पण व्यसनाच्या मार्गावर गेलेल्या व्यक्तींना योग्य दिशेला आणणे हे अत्यंत कठीण आणि महत्त्वाचे काम आहे.

पुरस्कार हा केवळ सन्मान नसून कार्यकर्त्यांच्या कष्टांची दखल आहे, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

व्यसनामुळे केवळ व्यक्तीच नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य आहे. एखादे कुटुंब वाचविणे हेच मोठे यश असून त्यातून मिळणारा आशीर्वाद हा खरा ठेवा आहे, असेही मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.

पुरस्कारांतंर्गत व्यक्तीगत पुरस्कारासाठी रु.१५ हजार सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह,शाल,साडी, खण आणि श्रीफळ तसेच संस्था पुरस्कारासाठी रु. ३० हजार सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ याप्रमाणे पुरस्काराचे वितरण करण्यात आले या ५ वर्षांच्या पुरस्कार निवडीमध्ये एकुण १०० व्यक्ती व १३ संस्थांचा समावेश आहे. या १०० व्यक्तींपैकी ८८ पुरुष व १२ महिलांचा समावेश होता

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande