
रायगड, 27 मार्च (हिं.स.)। वडिलोपार्जित जागेच्या वादातून झालेल्या वादातून एका व्यक्तीस मारहाण करून जखमी केल्याची घटना रसायनी पोलीस ठाणे हद्दीत घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. 26 मार्च 2026 रोजी पहाटे सुमारे 4:20 वाजण्याच्या सुमारास मौजे तुराडे गाव हद्दीत रसायनी कॉर्नरजवळ घडली. तक्रारदार व आरोपी यांच्यात वडिलोपार्जित जागेवरून वाद असल्याचे समोर आले आहे.
तक्रारीनुसार, संबंधित आरोपीने फोन करून तक्रारदारास शिवीगाळ करत ठराविक ठिकाणी येण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार व त्यांचा मुलगा समजावण्यासाठी गेले असता आरोपीने शिवीगाळ करून हाताबुक्क्याने मारहाण केली. तसेच इतर आरोपींनी तक्रारदारास पकडून ठेवले असताना मुख्य आरोपीने फुटलेल्या बिअरच्या बाटलीने डाव्या हातावर वार करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, तक्रारदाराचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी पुढे आला असता त्यालाही मारहाण करण्यात आली व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 49/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)