जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सदानंद अंचवल स्मृती पुरस्कारांचे वितरण
पुणे, 27 मार्च (हिं.स.)। एकेकाळी सुवर्ण भारत म्हणून ओळखला जाणारा देश पुन्हा नव्याने घडवून त्याला जगाचे गुरुस्थान प्राप्त करून देण्याची जबाबदारी आजच्या विद्यार्थी वर्गावर आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केले. विद्यार्थ
Distribution of Sadanand Anchawal Memorial Award


पुणे, 27 मार्च (हिं.स.)। एकेकाळी सुवर्ण भारत म्हणून ओळखला जाणारा देश पुन्हा नव्याने घडवून त्याला जगाचे गुरुस्थान प्राप्त करून देण्याची जबाबदारी आजच्या विद्यार्थी वर्गावर आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवताना राष्ट्रनिष्ठा आणि कामावरील निष्ठा अबाधित ठेवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

रमणबाग प्रशालेत जागतिक रंगभुमी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बलकवडे आणि उद्योजक डॉ. दिलीप देशपांडे यांच्या हस्ते सदानंद अचवल यांच्या स्मरणार्थ नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार अमेरिकास्थित अनिल प्रयाग यांनी प्रायोजित केलेले आहेत.

यावेळी ‘नाट्य आराधना’ पुरस्काराने इयत्ता सहावीतील अमोघ किरण कुलकर्णी, तर ‘नाट्य प्रेरणा’ पुरस्काराने इयत्ता दहावीतील गौरव विशाल जगताप यांचा सन्मान करण्यात आला. तसेच राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेल्या ‘माय सुपर हिरो’ या नाटकातील विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना बलकवडे यांनी कला ही व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले. “कला माणसाचे जीवन समृद्ध करते आणि ती प्रभावी संवादाचे साधन आहे. भारताला ६४ कलांची परंपरा लाभली असून नव्या पिढीने ती अधिक समृद्ध करावी,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिलीप देशपांडे यांनी नाटकाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “नाटक हा समाजाचा आरसा आहे. समाजातील चांगल्या-वाईट गोष्टींचे प्रभावी चित्रण नाटकातून करता येते. ही जिवंत कला असल्याने कलाकारांकडे समयसूचकता आणि एकाग्रता अत्यावश्यक असते.”

या कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. शरद आगरखेडकर, पर्यवेक्षिका अंजली गोरे, मंजुषा शेलूकर, नाट्यछंद विभागाचे प्रमुख रवींद्र सातपुते यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि १९६३ च्या मॅट्रिक बॅचमधील अचवल यांचे अनेक वर्गमित्र उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande