
लातूर, 27 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील काही महिन्यांपासून जनावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी व ग्रामीण नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. जनावरे ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जात असल्याने अशा प्रकारच्या चोरीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस दलाने मालमत्ता संबंधी गुन्ह्यांविरोधात विशेष मोहीम राबवून गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण व तपास यावर विशेष भर दिला.
पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या सूचना व निर्देशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी अत्यंत नियोजनबद्ध कारवाई करत एका सराईत आरोपीस अटक करून जिल्हाभरातील अनेक जनावर चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथक मालमत्ता संबंधी गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत असताना अहमदपूर येथे गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. सदर कारवाईदरम्यान दुपारी २६ मार्च रोजी १५.०० वा. एक संशयित इसम ताब्यात घेण्यात त्या इसमाने आपली ओळखइस्माईल दस्तगिर शेख (वय ४३ वर्षे, रा. किल्लारी, सध्या दापका, ता. निलंगा, जि. लातूर)
अशी दिली. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून ₹४,१९,०००/- रोख रक्कम मिळून आली. सखोल चौकशीत आरोपीने कबूल केले की, तो मागील सुमारे एक वर्षापासून लातूर जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागात म्हैस, गाय व वासरे चोरी करून त्यांची विक्री करत होता.तपासादरम्यान खालील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्याने केलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis