
जळगाव , 27 मार्च (हिं.स.) कर्जाच्या नावाखाली उद्योगपतीला जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्यानंतरही आणखी खंडणीसाठी धमक्या देणाऱ्या हरयाणातील सावकारी टोळीचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी निलॉन्स एंटरप्रायझेसचे संचालक दीपक सुरेशचंद संघवी यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार दीपक सुरेशचंद संघवी हे जळगावातील ‘निलॉन्स एंटरप्रायझेस’ या कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्या मालकीच्या कंपनीला २०२०-२१ च्या कोविड काळात ३५ ते ४० कोटी रुपयांच्या मालाचे नुकसान सोसावे लागले. परिणामी बँकांचे कर्ज थकले, क्रेडिट रेटिंग घसरले आणि त्यांना नवीन कर्ज मिळणे कठीण झाले.याच दरम्यान, नोव्हेंबर २०२२ मध्ये जळगाव शहरातील महाबळ परिसरातील कंपनीच्या कार्यालयात अमित गुप्ता आणि दीपक रॉय या एजंट्सनी त्यांची ओळख हरयाणातील सावकारांशी करून दिली. दिनेश अहलावत आणि भरपूर सिंग यांनी २ कोटींचे कर्ज दिले. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण करून उद्योजकाला कर्जाच्या साखळीत अडकवण्यात आले. अशा प्रकारे त्यांना तब्बल ३५ वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमामधून कर्ज घेण्यास भाग पाडण्यात आले. केवळ आठ ते १५ दिवसांच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांची रक्कम देऊन त्यावर प्रचंड व्याज आकारले जात होते. कर्ज देतानाच उद्योजकाकडून कोरे धनादेशावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. पुढील काळात याच धनादेशांचा वापर करून अधिक पैसे उकळण्यासाठी दबाव टाकण्यात आला.संशयितांनी कंपनीच्या कार्यालयात घुसून सुरक्षा रक्षकांना मारहाण केली, कर्मचाऱ्यांना धमकावले तसेच कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यामुळे उद्योजक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा मानसिक ताण निर्माण झाला होता. या प्रकरणात अमित गुप्ता, दिनेश अहलावत, भरपूर सिंग, उज्ज्वल कटारिया, संदीप गिल, संदिप अहलावत (फौजी), संतकुमार, जितेंद्र सिंग, आशिष देस्वाल, सागर सुहाग, सुमित पहेलवान, सुधीर पहेलवान यांच्यासह ३५ जणांवर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने संपूर्ण प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर