
मुंबई, 28 मार्च, (हिं.स.)। जीजिविषा काळे दिग्दर्शित 'तिघी' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रेम मिळत आहे. नात्यांच्या गुंतागुंतीतून उलगडणारी आई- मुलींची भावनिक कथा आणि वास्तववादी मांडणी यामुळे 'तिघी'ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. तीन वेगवेगळ्या स्त्रियांच्या आयुष्याभोवती फिरणारा हा चित्रपट त्यांच्या नात्यांमधील भावविश्व, संघर्ष, स्वत्वाचा शोध आणि एकमेकींशी असलेला अदृश्य बंध यावर आधारित आहे. स्त्रीमनाचा सूक्ष्म वेध घेत, आयुष्यातील छोट्या-छोट्या भावनिक क्षणांना प्रभावीपणे मांडणारा हा चित्रपट अनेकांना आपलासा वाटत आहे.
दरम्यान, काही प्रेक्षकांचा हा चित्रपट पाहायचा राहून गेल्याने नागपूरमध्ये एक वेगळीच चळवळ सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे. नागपूरमधील सुखदा चौधरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढाकार घेत 'तिघी'चा खास शो आयोजित करण्यासाठी किमान शंभर प्रेक्षक एकत्र आणण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक जण या उपक्रमात सहभागी होत आहेत. एका प्रेक्षकाने घेतलेला हा पुढाकार सध्या चर्चेचा विषय ठरत असून आशयप्रधान चित्रपटांसाठी प्रेक्षक स्वतः पुढे येत असल्याचं हे महत्त्वाचं उदाहरण मानलं जात आहे.
दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणाल्या, '' आम्ही 'तिघी' हा चित्रपट प्रामाणिकपणे प्रेक्षकांसमोर आणला. परंतु आज प्रेक्षक स्वतः पुढे येऊन शो आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहेत, ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि भावनिक गोष्ट आहे. 'तिघी' महाराष्ट्रभर पोहोचतोय आणि प्रेक्षकांना तो पाहायची तीव्र इच्छा आहे, यावरूनच खूप काही स्पष्ट होतंय.''
सध्या ‘तिघी’ला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळत असून नागपूरमध्येही हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळावा, अशी मागणी प्रेक्षक करत आहेत. त्यामुळे आता 'तिघी' हा केवळ एक चित्रपट राहिलेला नाही... तर तो प्रेक्षकांच्या प्रेमातून घडत असलेला एक क्षण बनला आहे.
सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केले असून निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस निर्माते आहेत. या चित्रपटात भारती आचरेकर, नेहा पेंडसे -बायस आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर