अकोला - मृतदेहाचे गूढ उकलले; अकोला स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
अकोला, 29 मार्च, (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील रिधोरा शेतशिवारातील दुर्गम जंगल भागात २६ मार्च रोजी मिळून आलेल्या कुजलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या काही तासां
Photo


अकोला, 29 मार्च, (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील रिधोरा शेतशिवारातील दुर्गम जंगल भागात २६ मार्च रोजी मिळून आलेल्या कुजलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या काही तासांत मृतदेहाची ओळख पटवून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार २६ मार्च २०२६ रोजी रिधोरा शिवारातील एका दुर्गम भागात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पूर्णपणे खराब झाला असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दोन विशेष पथके तयार केली.

मृतदेहाच्या अंगावरील कपडे आणि इतर वस्तूंच्या आधारे पोलिसांनी आजूबाजूच्या गावांत चौकशी केली. तपासादरम्यान, हा मृतदेह अमानतपूर ताकोडा, ता. बाळापूर येथील सचिन वाल्मीक खंडारे वय २९ वर्ष याचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सचिन हा त्याच्या दोन मित्रांसोबत मोटारसायकलवर जाताना दिसून आला होता. संशयावरून पोलिसांनी तपास केला असता, आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी पाठलाग करून अभिषेक प्रकाश गवळी याला दर्यापूर जि. अमरावती येथून आणि आदेश सुधीर डोंगरे याला भुसावळ जि. जळगाव येथून ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हा कबूल केला असून घटनेच्या दिवशी मृत सचिन आणि आरोपींनी एकत्र दारू प्यायली होती. दारूच्या नशेत त्यांच्यात आपपसात वाद झाला आणि याच वादातून दोघांनी मिळून सचिनची हत्या केल्याचे उघड झाले आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande