
लातूर, 29 मार्च, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 28 मार्च रोजी पहाटे 5 वाजल्यापासून ते 29 मार्च रोजी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सलग 21 तास विशेष मोहीम राबविण्यात आली.
या कालावधीत जिल्हा पोलीस दलाने एकाच वेळी विविध टप्प्यांत मोठ्या प्रमाणावर छापेमारी, सर्वंकष तपास मोहीम तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविली. या संयुक्त कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आघात करण्यात आला.
अवैध दारू व्यवसायावर कारवाई
28 मार्च रोजी पहाटे घेण्यात आलेल्या छापेमारीत दुर्गम भागात हातभट्टी दारू तयार करणारे तसेच देशी-विदेशी मद्याची अवैध विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. एकूण 74 आरोपींविरुद्ध 74 गुन्हे दाखल करण्यात आले असून 4 लाख 19 हजार 342 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये हातभट्टी दारू, रसायने, भट्ट्या, ड्रम, प्लास्टिक कॅन व मद्यसाठ्याचा समावेश आहे. तसेच तयार दारू व कच्चा माल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.
सराईत गुन्हेगारांवर कारवाई
यानंतर रात्री विशेष सर्वंकष शोधमोहीम राबवून 19 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. शस्त्र कायद्यान्वये 8 गुन्हे नोंदविण्यात आले असून मालमत्तेविषयक गुन्ह्यांच्या तयारीत असलेल्या 4 संशयितांना अटक करण्यात आली.
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई
सायंकाळी 8 ते रात्री 11 दरम्यान विशेष तपास मोहिमेत 24 प्रकरणे नोंदविण्यात आली. तसेच जिल्ह्यात 34 ठिकाणी नाकाबंदी करून 34 अधिकारी व 149 अंमलदार तैनात करण्यात आले होते.
सतत 21 तास चाललेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून अशा प्रकारच्या व्यापक व अचानक कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलीसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis