

रायगड, 30 मार्च (हिं.स.) : रायगडमध्ये आज सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास एन. डी. स्टुडिओजवळ लोखंडी स्टील पाईप वाहतूक करणारा कंटेनर ट्रक पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
माहितीनुसार, एमएच 01 ईएम 4414 क्रमांकाचा कंटेनर मुडबड येथून लोधिवलीकडे जात असताना स्टुडिओजवळील वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने ट्रक पलटी झाला. ट्रकमध्ये लोखंडी स्टील पाईप मोठ्या प्रमाणावर लोड असल्यामुळे वाहनाचा तोल बिघडला आणि कंटेनर रस्त्यावर पलटी झाला.
अपघातानंतर काही काळ वाहतुकीत कोंडी निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या. नागरिकांनीही संयम बाळगून पोलिसांना सहकार्य केले.
पोलिसांनी सांगितले की, अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या कडेला असल्यामुळे मोठा अपघात टळला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)