
अमरावती, 30 मार्च (हिं.स.) । शहरातील सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयाची सुमारे २ कोटी ९५ लाख ४९ हजार ४२१ रुपयांनी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला असून याप्रकरणी रविवार, २९ मार्च रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात १० संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकित ए. वर्मा, स्वप्नील डोळे, राजेश भेंडीराम डोंगरे, अतुल व्यंकटराव लांगे, कार्तिक कल्याण लांगे, अमोल लांगे, अभिजित भनग आणि इतर तीन महिला अशी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. बँकेचे साहाय्यक महाप्रबंधक सुनील देवस्वरुप पाण्डेय (४९) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारीनुसार, सदर १० आरोपींनी संगनमत करून बँकेच्या निधीचा अपहार केला. आरोपींनी विश्वासघात करून बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या आणि खोटे दस्तऐवज तयार केले. हे दस्तऐवज खरे असल्याचे भासवून त्यांनी सरकारी निधीतून २.९५ कोटींहून अधिक रक्कम हडपली. ही रक्कम आरोपींनी स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी खर्च करून बँकेची मोठी फसवणूक केली आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी