“देश जवळपास नक्षलवादमुक्त, बस्तरमध्ये विकासाला वेग”- अमित शाह
नवी दिल्ली, 30 मार्च (हिं.स.) : देशातून नक्षलवाद जवळपास संपल्यात जमा आहे. विशेषतः छत्तीसगडचा बस्तर परिसरात नक्षलवाद संपल्यात जमा असून विकासाने वेग धरल्याचे प्रतिपादन गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेतील भाषणात केले. यासंदर्भात अमित शाह म्हणाले की,
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री


नवी दिल्ली, 30 मार्च (हिं.स.) : देशातून नक्षलवाद जवळपास संपल्यात जमा आहे. विशेषतः छत्तीसगडचा बस्तर परिसरात नक्षलवाद संपल्यात जमा असून विकासाने वेग धरल्याचे प्रतिपादन गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेतील भाषणात केले.

यासंदर्भात अमित शाह म्हणाले की, छत्तीसगडच्या बस्तरमध्ये नक्षलवाद जवळजवळ पूर्णतः समाप्त झाला आहे. या भागातील प्रत्येक गावात शाळा उभारण्याची आणि रेशन दुकाने सुरू करण्याची मोहीम राबवण्यात आली आहे, ज्यामुळे स्थानिक लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत आहेत. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी सांगितले की, 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर देशातील गरीबांना घर, गॅस, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य विमा आणि मोफत धान्य यांसारख्या सुविधा मिळाल्या. मात्र, बस्तर या सुविधांपासून पूर्वी वंचित राहिला होता, कारण त्या भागावर नक्षलवादाचे सावट होते.

शाह यांनी स्पष्ट केले की, नक्षलवादामुळेच बस्तरमध्ये विकास पोहोचू शकला नाही. मात्र, मोदी सरकारच्या काळात हे सावट दूर झाले असून आता बस्तरमध्ये विकासाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्यांनी इशारा दिला की, जो कोणी शस्त्र उचलून हिंसा करेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मागील सरकारांवर निशाणा साधताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, 75 वर्षांपैकी 60 वर्षे सत्तेत राहूनही आदिवासी भागांचा विकास का झाला नाही? घर, पाणी, शाळा आणि बँकिंग सुविधा का पोहोचल्या नाहीत, याचे आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.

आपल्या भाषणात त्यांनी इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांचाही उल्लेख केला. डाव्या विचारसरणीमुळे नक्षलवाद वाढल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी नक्षलवादी हा मोठा धोका असल्याचे पूर्वीही मान्य करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.काही लोकांनी नक्षलवाद्यांची तुलना भगत सिंग आणि बिरसा मुंडा यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांशी केल्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. त्यांनी असे म्हणणे अयोग्य आणि अस्वीकार्य असल्याचे स्पष्ट केले.नक्षलवादाची मुळे गरीबीत नसून ती वैचारिक असल्याचे त्यांनी सांगितले. भारत हा लोकशाही देश असून संविधानाच्या चौकटीत राहूनच समस्या सोडवाव्या लागतात, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

नक्षलवादाच्या इतिहासाचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, 1970 च्या दशकात पश्चिम बंगालमधील नक्षलबाडी येथे या चळवळीची सुरुवात झाली. पुढे ती महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये पसरली.शेवटी, अमित शाह यांनी ठामपणे जाहीर केले की, देशात माओवादी आणि नक्षलवादी हिंसा करणाऱ्यांचे दिवस आता संपले आहेत.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande