आयुर्वेद विषयक संशोधन 13 भाषांमध्ये उपलब्ध होणार
* केंद्रीय आयुर्वेदशास्त्र संशोधन परिषद आणि अनुवादिनी एआय यांच्यात सामंजस्य करार नवी दिल्ली, 30 मार्च (हिं.स.) - आयुर्वेदाविषयीची तथ्ये आणि पुराव्यावर आधारित माहिती, कोणत्याही भाषिक अडथळ्यांशिवाय सर्वत्र पोहचवा या उद्देशाने आयुष मंत्रालयाच्या अख
करार


* केंद्रीय आयुर्वेदशास्त्र संशोधन परिषद आणि अनुवादिनी एआय यांच्यात सामंजस्य करार

नवी दिल्ली, 30 मार्च (हिं.स.) -

आयुर्वेदाविषयीची तथ्ये आणि पुराव्यावर आधारित माहिती, कोणत्याही भाषिक अडथळ्यांशिवाय सर्वत्र पोहचवा या उद्देशाने आयुष मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रीय आयुर्वेदशास्त्र संशोधन परिषदेने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुवादिनी एआय या व्यासपीठासोबत एक सामंजस्य करार केला आहे. अनुवादिनी एआय हे व्यासपीठ अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने विकसित केले आहे. संपूर्ण भारतभरात आयुर्वेदाविषयीच्या तथ्ये आणि पुराव्यावर आधारित ज्ञानाच्या सार्वत्रिक उपलब्धतेची व्याप्ती विस्तारणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या सामंजस्य करारांतर्गत, अनुवादिनी एआय ही यंत्रणा केंद्रीय आयुर्वेदशास्त्र संशोधन परिषदेची संशोधने आणि शैक्षणिक साहित्य हिंदीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करणार आहे. यामुळे आयुर्वेदाविषयीचे तथ्ये आणि पुराव्यावर आधारीत ज्ञान देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकेल.

केंद्रीय आयुर्वेदशास्त्र संशोधन परिषदेचे महासंचालक प्रा. वैद्य रबिनारायण आचार्य आणि अनुवादिनी एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बुद्ध चंद्रशेखर यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ही भाषांविषयक प्रगत तंत्रज्ञान आणि भारताच्या पारंपारिक वैद्यकीय ज्ञानाचे एकात्मिकरण घडवून आणणारी एक महत्वाची घडामोड ठरली आहे.

अनुवादिनी एआय अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे, प्रामुख्याने तांत्रिक, वैज्ञानिक आणि प्रशासनाशी संबंधित ज्ञानाचे विविध भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद केला जातो. नागरिकांची भाषक किंवा प्रादेशिक पार्श्वभूमी काहीही असली तरी देखील त्यांना विश्वसार्ह आणि संशोधनावर आधारित माहिती उपलब्ध करणे हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे.

देशभरातील 25 राज्यांमध्ये 30 संस्थांच्या माध्यमातून केंद्रीय आयुर्वेदशास्त्र संशोधन परिषदेचे जाळे विस्तारलेले आहे. परिषदेच्या या व्यापक व्यवस्थेअंतर्गत आयुर्वेदशास्त्राशी संबंधित विज्ञाननिष्ठ संशोधनांचे प्रकाशन केले जाते. त्याच अनुषंगाने परिषदेद्वारे इतर माहितीपर, शैक्षणिक आणि संवादात्मक साहित्यासोबतच केंद्रीय आयुर्वेदशास्त्र संशोधन परिषद बुलेटिन हे संशोधनविषयक एक प्रमुख त्रैमासिक नियतकालिक काढले जाते. सध्या हे सर्व साहित्य सध्या प्रामुख्याने इंग्रजीमध्ये प्रकाशित केले जाते. आता झालेल्या या सामंजस्य करारांतर्गत, अनुवादिनी एआय या सर्व संशोधनपर प्रकाशने आणि शैक्षणिक साहित्याचे 13 प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करणार आहे. यामुळे आयुर्वेद विषयक मूळ ज्ञान मोठ्या व्यापक लोकसंख्येपर्यंत पोहचू शकणार आहे, परिणामी चुकीच्या माहिती पसरण्याचा धोकाही कमी होऊ शकणार आहे.

करार स्वाक्षरीनिमीत्त झालेल्या कार्याक्रमाला केंद्रीय आयुर्वेदशास्त्र संशोधन परिषदेचे महासंचालक प्रा. रबिनारायण आचार्य यांनी संबोधित केले. या सहकार्यातून केंद्रीय आयुर्वेदशास्त्र संशोधन परिषदेची वचनबद्धता दिसून येत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. आयुर्वेद विषयक संशोधनाचे लाभ हे केवळ शैक्षणिक समुदायापुरते मर्यादीत न राहता, ते देशभरातील सर्व नागरिकांना त्यांच्या त्यांच्या भाषांमधून मिळायला हवेत यासाठी परिषद वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

अनुवादिनी एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बुद्ध चंद्रशेखर यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. विशेषतः तंत्रज्ञानाच्या मदतीने समाजाला सुलभतेने - न्याय पद्धतीने आणि सक्षमीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले जाईल अशा रितीने ज्ञान उपलब्ध होत राहील यासंबंधीच्या उपक्रमांना पाठबळ देण्यासाठीच हे व्यासपीठ विकसित केले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भविष्यात या उपक्रमाची व्याप्ती परदेशी भाषांपर्यंत विस्तारली जाण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने ज्या देशांमध्ये आयुष मंत्रालय आणि केंद्रीय आयुर्वेदशास्त्र संशोधन परिषदेने आयुष अध्यासनाची स्थापना केली आहे, त्या देशांमधील भाषांपासून या उपक्रमाची सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे आयुर्वेदाविषयीच्या मूळ ज्ञानाची जागतिक उपलब्धताही वाढू शकणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande