अमरावतीत वाळू तस्कराचा ग्राम महसूल अधिकाऱ्यावर हल्ला
अमरावती, 30 मार्च (हिं.स.) : शासकीय कर्तव्य बजावत असताना अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडल्याच्या रागातून ग्राम महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून ट्रक पळवून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री तोंडगाव फाट्यावर घडली. घटनेनंतर ग्राम महसूल अधिक
वाळूमाफियाची महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की


अमरावती, 30 मार्च (हिं.स.) : शासकीय कर्तव्य बजावत असताना अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडल्याच्या रागातून ग्राम महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून ट्रक पळवून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री तोंडगाव फाट्यावर घडली.

घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी प्रफुल्ल डवरे यांनी अचलपूर येथील ट्रक मालक मतीन खान (रा. अचलपूर) याच्याविरुद्ध परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. माहितीप्रमाणे, प्रफुल्ल डवरे हे शासकीय कामासाठी चांदूर बाजार तहसील कार्यालयाकडे जात होते, तेव्हा तोंडगाव फाट्यावरून वाळूने भरलेला ट्रक गावाकडे जाताना दिसला. त्यांनी ट्रक थांबवून चालकाकडे वाळू वाहतुकीचा वैध परवाना मागितला, मात्र चालकाकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळले.

कारवाई सुरू असताना ट्रक मालक मतीन खान घटनास्थळी दाखल झाला आणि महसूल अधिकाऱ्याशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर जबरदस्तीने ट्रक घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

ग्राम महसूल अधिकारी प्रफुल्ल डवरे यांनी त्वरित परतवाडा पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत संबंधित आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे आणि अवैध गौण खनिज चोरीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande