
कोलकाता , 31 मार्च (हिं.स.)।पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या चौथ्या यादीत १३ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. तसेच दुसऱ्या यादीत जाहीर करण्यात आलेल्या एका उमेदवाराचे नाव बदलण्यात आले आहे. यानुसार, दुसऱ्या यादीत घोषित मयनागुडी (अनुसूचित जाती) मतदारसंघातून आता दालिम रॉय हे भाजपचे उमेदवार असतील.
नव्या यादीप्रमाणे सिताई मतदारसंघातून आशुतोष वर्मा, नाटाबारीतून गिरिजा शंकर रॉय, बागदा येथून सोमा ठाकुर, मगराहाट पूर्व येथून उत्तम कुमार बनिक आणि फालटा मतदारसंघातून देबांगशु पांडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच सोनारपूर उत्तर येथून देबाशीष पाठक, हावडा दक्षिण येथून श्यामल हाती, पंचला मतदारसंघातून रंजन कुमार पॉल, चंडीपूर येथून पीयूष कांती दास, गारबेटा येथून प्रदीप लोढा, मेमारी येथून मानव गुहा आणि बाराबनी मतदारसंघातून अरिजित रॉय हे भाजपचे उमेदवार असतील.
भाजप पश्चिम बंगालमधील सर्व २९४ जागांवर निवडणूक लढवत आहे. आतापर्यंत पक्षाने २८७ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत १४४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती, तर दुसऱ्या यादीत १११ आणि तिसऱ्या यादीत १९ उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. आता चौथ्या यादीत १३ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
बंगाल भाजपचे अनेक प्रमुख नेते निवडणूक मैदानात उतरले आहेत. यामध्ये सुवेंदू अधिकारी, दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, स्वपन दासगुप्ता, निशीथ प्रमाणिक, रूपा गांगुली, जितेंद्र कुमार तिवारी आणि कौस्तव बागची यांसारख्या नावांचा समावेश आहे. संदेशखाली प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या रेखा पात्रा यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच आरजी प्रकरणातील मृत डॉक्टरांच्या आईलाही यावेळी भाजपने उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी २३ एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून, निवडणुकीचे निकाल ४ मे रोजी जाहीर केले जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode