
वॉशिंग्टन , 31 मार्च (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पहाटे इराणच्या इस्फहान शहरावर ‘बंकर बस्टर’ बॉम्बद्वारे हल्ला केला. या भीषण स्फोटाचा व्हिडिओ ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फुटेजमध्ये सलग अनेक स्फोट होताना दिसतात. त्यानंतर लागलेल्या भीषण आगीमुळे रात्रीचे आकाश नारंगी रंगाने उजळून निघाल्याचे दिसते.
ट्रम्प यांनी या व्हिडिओबाबत कोणताही संदर्भ दिलेला नसला, तरी माध्यमांच्या अहवालांनुसार हा व्हिडिओ इस्फहानमधील एका मोठ्या दारुगोळा साठा केंद्रावर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्याचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. इस्फहान हे सुमारे 23 लाख लोकसंख्या असलेले इराणमधील महत्त्वाचे शहर असून येथे बदर मिलिटरी एअरबेस देखील स्थित आहे.
अहवालानुसार, एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगण्यात आले की अमेरिकन सैन्याने इस्फहानमधील दारुगोळा डेपोवर 2,000 पाउंड (सुमारे 907 किलोग्रॅम) वजनाच्या ‘बंकर बस्टर’ बॉम्बद्वारे हल्ला केला. अधिकाऱ्याने सांगितले की या कारवाईत मोठ्या प्रमाणावर बंकर बस्टर किंवा ‘पेनेट्रेटर’ प्रकारच्या स्फोटकांचा वापर करण्यात आला.या हल्ल्यानंतर सलग जोरदार स्फोटांची मालिका सुरू झाली, ज्यामुळे परिसरात प्रचंड अग्निगोळे आणि तीव्र धक्कातरंग (शॉकवेव्ह्स) पसरल्याचा दावा अहवालांमध्ये करण्यात आला आहे.
अलीकडील अहवालांनुसार, इराणने सुमारे 540 किलोग्रॅम अत्यंत समृद्ध युरेनियमचा साठा इस्फहानमधील भूमिगत सुविधेत हलवला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’ अंतर्गत अमेरिकेने केलेल्या हल्ल्यातही या शहराला लक्ष्य करण्यात आले होते. त्या कारवाईचा मुख्य उद्देश शहरातील अणु-सुविधांवर हल्ला करणे हा होता.
----------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode