
रत्नागिरी, 31 मार्च, (हिं. स.) : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला १० कोटी ९४ लाखाचा निव्वळ नफा, ९९.८२ टक्के विक्रमी वसुली आणि गेल्या आर्थिक वर्षात १८.८१ टक्के व्यवसाय वृद्धी नोंदवली आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
आर्थिक वर्ष संपण्याच्या दिवशी पतसंस्थेचा लेखाजोखा मांडण्याच्या प्रथेनुसार आज त्याबाबतच्या पत्रकार परिषदेत श्री. पटवर्धन बोलत होते. ते म्हणाले, स्वरूपानंद पतसंस्थेने ३५ वर्षांत सातत्यपूर्ण व्यवसाय वृद्धी करत उत्तम आर्थिक सौष्ठव राखले असल्याने संस्थेची विश्वासार्हता जनमानसाच्या मनावर कोरली गेली आहे. आज संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी ४०८ कोटी ८८ लाख तर कर्जवितरण ३०२ कोटी ६५ लाख रुपयांचे झाले असून संमिश्र व्यवसाय ७११ कोटींचा केला असून संस्थेने १६९ कोटी २९ लाखांच्या बँक गुंतवणुका केल्या. गुंतवणुकांमध्ये गतवर्षीपेक्षा १३.३६ टक्के वाढ नोंदवली आहे. ठेवींमध्ये ६२ कोटींची वाढ झाली असून ठेवींमध्ये १८ टक्के वाढ नोंदवत ठेवी ४०८ कोटी ८८ लाखाच्या घरात पोहोचल्या आहेत. संस्थेच्या कर्जामध्ये ५० कोटींची वाढ झाली असून कर्जवितरणात लक्षणीय १९.७९ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या सर्वामुळे संस्थेचे वार्षिक उत्पन्न ४८ कोटीपर्यंत पोहोचले असून उत्तम व्यवस्थापन व उपलब्ध निधीचा योग्य विनीयोग केल्याने उत्तम नफा मिळविला आहे.
गेल्या ५ वर्षांत २०२१-२२ मध्ये ६ कोटी २१ लाख, २०२२-२३ मध्ये ६ कोटी ६३ लाख, २०२३-२४ मध्ये ७ कोटी ०३ लाख, २०२४-२५ साली ८ कोटी ३२ लाख, तर आज संपलेल्या वर्षात १० कोटी ९४ लाखाचा निव्वळ नफा पतसंस्थेला झाला आहे.
संस्थेने प्राप्त केलेल्या नफ्याचा विनियोग संस्थेने स्वनिधी वाढवण्यासाठी केला आहे. झालेल्या नफ्यातून अत्यावश्यक खर्च करून उर्वरित ५० टक्क्यांपेक्षा जास्त नफा स्वनिधी वाढवण्यासाठी संस्थेने गुंतवून आर्थिक पाया भक्कम केला. पतसंस्थेचा स्वनिधी आता ५५ कोटी झाला आहे. याव्यतिरिक्त गेल्या ३५ वर्षांत साधारणतः २६००० चौरस फुटाच्या प्रॉपर्टी, १० कार्यालये संस्थेने स्वमालकीची खरेदी केली आहेत.
संस्थेने भांडवल पर्याप्तता अर्थात C.R.A.R. चे प्रमाण २८.०८ टक्के असे लक्षणीय राखले आहे. असणारे धोके, देणी जुळविण्याएवढे स्वभांडवल संस्थेकडे किती प्रमाणात आहे हे दर्शवणारा C.R.A.R. उत्तम असल्याने ठेवीदार, गुंतवणूकदार पूर्ण विश्वासून संस्थेकडे गुंतवणूक करतात. संस्थेकडे ३१ कोटींच्या घरात बचत ठेवी आहेत. बचत ठेवींचे हे प्रमाण अर्थ जगतासाठी लक्षणीय आहे. संस्थेच्या एकूण ठेवी ४०८ कोटी ८८ लाख झाल्या असून २०२६-२७ या आर्थिक वर्षात त्या ५०० कोटीपर्यंत पोहोचतील या दृष्टीने प्रयत्न राहणार आहेत. संस्थेचे कर्ज व्यवहारही ३०० कोटींच्या पलीकडे गेले असून संस्थेच्या आर्थिक शिस्तीच्या संस्कारातून उत्तम व्यवस्थापन व चोखंदळ कर्ज व्यवहार धोरण असल्याने व कर्जदारांच्या उत्तम सहकार्याने संस्थेची वसुली ९९.८२ टक्के अशी विक्रमी राखण्यात संस्था सातत्याने यशस्वी झाली आहे. संस्थेच्या ७ शाखांची वसुली १०० टक्के झाली असून अन्य शाखांमध्येही हाताच्या बोटावर मोजण्याइतके कर्जदार वगळता उत्तम वसुली व उत्तम नफा प्राप्त झाला आहे.
संस्थेचा आर्थिक पाया सहकार तत्त्वानुरूप वृद्धिंगत होत असतांनाच ४९ हजार सभासदांचा हा एकजिनसी समूह झाला आहे. ४९ हजार सभासदांच्या सामूहिक ऊर्जेतून स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थविश्व अग्रेसर होत आहे, असे श्री. पटवर्धन यांनी सांगितले.
नवीन आर्थिक वर्षात ५०० कोटींचा ठेव टप्पा गाठण्याचे पतसंस्थेचे उद्दिष्ट आहे. येत्या २०२६-२७ आर्थिक वर्षात स्वमालकीच्या प्रशस्त ४ मजली इमारतीत नवी शाखा आणि प्रधान कार्यालय शानदारपणे प्रस्थापित करणे ही उद्दिष्टे आहेत, असेही अध्यक्षांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी