
इस्लामाबाद , 04 मार्च (हिं.स.)।इराणवर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानमध्ये चिंता वाढली आहे, कारण इराणसोबत त्याची 900 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची सीमा जोडलेली आहे. या मुद्द्यावर मंगळवारी (3 मार्च) पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी वक्तव्य करत इस्रायलवर गंभीर आरोप केले. ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, इस्रायल पाकिस्तानला आपली कठपुतळी बनवू इच्छित आहे आणि या योजनेत भारतही सहभागी आहे.
आसिफ यांच्या मते, या संघर्षात इस्रायलला आघाडी मिळाल्यास अफगाणिस्तान, भारत आणि इराण यांना एकत्र घेऊन पाकिस्तानविरोधात गट तयार केला जाऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तान चारही बाजूंनी शत्रूंनी वेढला जाईल आणि त्याची सुरक्षा कमकुवत होईल. पाकिस्तानचे अफगाणिस्तानसोबत आधीपासूनच तणावपूर्ण संबंध आहेत, ज्याला मंत्र्यांनी ‘ओपन वॉर’ असे संबोधले. याशिवाय, मे 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार दिवस लष्करी तणावही निर्माण झाला होता. इराणची सीमा पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताला लागून आहे, जिथे दीर्घकाळापासून बंडखोरी आणि अस्थिरतेची परिस्थिती कायम आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरील एका पोस्टमध्ये ख्वाजा आसिफ यांनी आरोप केला की 1948 मध्ये इस्रायलची स्थापना झाल्यानंतर इस्लामी जगतात झालेल्या अनेक संघर्षांमध्ये झायोनिझमची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भूमिका राहिली आहे. मुस्लिम देशांतील मोठ्या संघर्षांमागे हीच विचारधारा कार्यरत असल्याचा त्यांनी दावा केला. तसेच जगातील मोठ्या शक्तींवरही या विचारसरणीचा प्रभाव असून जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा देखील त्याच्यामुळे प्रभावित होत असल्याचे त्यांनी म्हटले. सध्याच्या संघर्षाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की इराण चर्चा करण्यास तयार होते, तरीही त्यावर युद्ध लादण्यात आले. त्यांच्या मते, हा संघर्ष इस्रायलचा प्रभाव पाकिस्तानच्या सीमांपर्यंत वाढवण्याच्या कटाचा भाग आहे.
ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानमधील 25 कोटी नागरिकांना राजकीय आणि धार्मिक मतभेद बाजूला ठेवून समान शत्रूंना ओळखण्याचे आवाहन केले. पाकिस्तानच्या अणु क्षमतेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की हीच ताकद देशाला सुरक्षित ठेवत आहे. 1998 मधील अणुचाचण्यांचाही त्यांनी उल्लेख केला आणि पाकिस्तानच्या सशस्त्र दलांच्या सामर्थ्याला जगभर मान्यता असल्याचे म्हटले. याशिवाय त्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ “पॅलेस्टाईन मुक्त होवो” असा नारा दिला आणि मुस्लिम देशांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode