
मुंबई, 04 मार्च (हिं.स.)। महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या शेती उपकरण व्यवसायाने फेब्रुवारी २०२६मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत दमदार कामगिरी नोंदवली आहे. कंपनीच्या फार्म इक्विपमेंट व्यवसायाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२६मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत ३२,१५३ ट्रॅक्टरची विक्री झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२५मध्ये हा आकडा २३,८८० युनिट्स इतका होता.
देशांतर्गत आणि निर्यात मिळून फेब्रुवारी २०२६मध्ये एकूण ३४,१३३ ट्रॅक्टरची विक्री झाली. मागील वर्षी याच कालावधीत ही विक्री २५,५२७ युनिट्स होती. निर्यातीतही कंपनीने चांगली प्रगती करत १,९८० ट्रॅक्टरची विक्री केली असून यात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात निर्यात विक्री १,६४७ युनिट्स होती.
एप्रिल ते फेब्रुवारी या आर्थिक वर्षातील कालावधीतही कंपनीची कामगिरी मजबूत राहिली आहे. चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत विक्री ४,६२,५२७ युनिट्सपर्यंत पोहोचली असून यात २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. निर्यात विक्री १८,८४१ युनिट्सवर गेली असून त्यातही २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण विक्रीचा आकडा ४,८१,३६८ युनिट्सपर्यंत गेला आहे.
कंपनीच्या शेती उपकरण व्यवसायाचे अध्यक्ष विजय नाक्रा यांनी सांगितले की, रब्बी पेरणीत झालेली वाढ, चांगली जलाशय पातळी आणि अनुकूल खरीप हंगामामुळे ग्रामीण भागातील रोख प्रवाह सुधारला आहे. याशिवाय सणासुदीच्या वातावरणामुळे ट्रॅक्टरच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. निर्यात बाजारपेठेतही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
एकूणच, शेती क्षेत्रातील सुधारलेली परिस्थिती आणि वाढती मागणी यामुळे महिंद्राच्या शेती उपकरण व्यवसायाला चालना मिळत असून आगामी महिन्यांतही ही वाढ कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule