
तेहरान, 04 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियातील युद्ध आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. तेहरानमधील असेंब्ली ऑफ एक्स्पर्ट्सने 56 वर्षीय मोजतबा खामेनेई यांची देशाच्या नव्या सर्वोच्च नेतापदी (सुप्रीम लीडर) निवड केली आहे. मोजतबा हे इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या अलीकडील हल्ल्यांमध्ये अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या नव्या नेतृत्वाबाबत तर्कवितर्क सुरू होते. रिव्होल्युशनरी गार्डच्या समर्थनामुळे मोजतबा यांची निवड झाल्याचे मानले जात आहे, मात्र ते उच्च पदस्थ धार्मिक नेते नाहीत.
माध्यमांच्या अहवालांनुसार, मोजतबा यांची निवड इराणी रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) च्या दबावाखाली झाल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे काही प्रश्नही निर्माण झाले आहेत, कारण इराणच्या इस्लामिक रिपब्लिकने नेहमीच वंशपरंपरागत सत्तेवर टीका केली असून स्वतःला निष्पक्ष व्यवस्था म्हणून मांडले आहे. सांगितले जाते की, गेल्या वर्षी अली खामेनेई यांनी संभाव्य उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत मोजतबा यांचे नाव समाविष्ट केले नव्हते. तसेच इराणच्या शिया धार्मिक परंपरेत वडिलांकडून मुलाकडे सत्ता हस्तांतरित होणे सामान्यतः मान्य मानले जात नाही.
विशेष म्हणजे, मोजतबा खामेनेई हे कोणतेही उच्च धार्मिक पद भूषवणारे नेते नाहीत. त्यांनी कधीही सरकारी पद सांभाळले नाही किंवा शासनात कोणतीही औपचारिक भूमिका बजावलेली नाही. तरीही देशाच्या राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. विशेषतः इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यांनी इराण-इराक युद्धादरम्यान इराणी सैन्यात सहभाग घेतला होता. खामेनेई कुटुंबातील युद्धातून बचावलेल्यांमध्ये मोजतबा यांचा समावेश होतो, तर त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगी, नातू, सून आणि जावई यांसह अनेक सदस्यांचा मृत्यू झाला होता.
संयुक्त राज्य अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने 2019 मध्ये मोजतबा खामेनेई यांच्यावर निर्बंध लादले होते. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, त्यांनी कोणतीही अधिकृत निवड किंवा नियुक्ती नसताना आपल्या वडिलांच्या कार्यालयात काम केले आणि माजी सर्वोच्च नेत्यांचे अनौपचारिक प्रतिनिधित्व केले होते. मोजतबा खामेनेई यांचा जन्म 1969 मध्ये मशहद शहरात झाला. ते अशा काळात वाढले, जेव्हा त्यांचे वडील शाहविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करत होते.
दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मोजतबा यांची सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती झाली आहे. त्यानंतर इस्रायल तसेच आखाती देशांतील अमेरिकन तळांवर इराणने केलेल्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांमुळे संपूर्ण पश्चिम आशियातील तणाव अत्युच्च पातळीवर पोहोचला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode