
मुंबई, 06 मार्च (हिं.स.)। तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एप्पलने भारतासह जागतिक बाजारपेठेत आपला सर्वात स्वस्त लॅपटॉप ‘मॅकबुक निओ’ सादर केला आहे. विद्यार्थ्यांपासून नव्या मॅक वापरकर्त्यांपर्यंत तसेच लहान उद्योग आणि घरगुती वापर लक्षात घेऊन हा लॅपटॉप तयार करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. आकर्षक रचना, हलके वजन आणि दमदार कार्यक्षमता यांचा संगम या नव्या लॅपटॉपमध्ये पाहायला मिळतो.
मॅकबुक निओ चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. सिल्व्हर, ब्लश, सिट्रस आणि इंडिगो असे हे रंग पर्याय आहेत. या लॅपटॉपची आगाऊ नोंदणी सुरू झाली असून ११ मार्च २०२६ पासून ग्राहकांना त्याची प्रत्यक्ष विक्री सुरू होणार आहे. रचनेच्या बाबतीत हा लॅपटॉप अत्यंत सडपातळ आणि हलका आहे. त्याची जाडी केवळ १२.७ मिमी असून वजन सुमारे १.२३ किलोग्राम आहे. यात १३ इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन २४०८ x १५०६ पिक्सेल आहे. डिस्प्लेची कमाल पीक ब्राइटनेस ५०० निट्स असून तो एक अब्ज रंगांचा सपोर्ट देतो. त्यामुळे चित्रफिती आणि छायाचित्रे अधिक स्पष्ट आणि जिवंत दिसतात.
कार्यक्षमतेसाठी या लॅपटॉपमध्ये सहा-कोर असलेला ए१८ प्रो चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे चिप आधी आयफोन १६ प्रोमध्ये वापरण्यात आले होते. एप्पलने प्रथमच आयफोनमध्ये वापरला जाणारा चिप मॅकबुकमध्ये दिला आहे. यासोबत पाच-कोर ग्राफिक्स प्रक्रिया प्रणाली आणि सोळा-कोर न्यूरल इंजिन देखील उपलब्ध आहे. दैनंदिन कामांमध्ये हा लॅपटॉप अनेक विंडोज संगणकांपेक्षा सुमारे पन्नास टक्क्यांपर्यंत वेगवान असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कामांमध्ये तर तो तीनपट अधिक जलद काम करू शकतो.
मॅकबुक निओमध्ये १०८० पिक्सेल दर्जाचा फेसटाइम कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे व्हिडिओ संभाषण अधिक स्पष्ट होते. याशिवाय मॅजिक कीबोर्ड, टच आयडी बोटांचे ठसे ओळखणारी प्रणाली आणि मल्टी-टच ट्रॅकपॅड देखील देण्यात आले आहे. यात ३६.५ वॅट तास क्षमतेची बॅटरी असून २० वॅटचा चार्जर चार्जिंगला सपोर्ट करतो. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर हा लॅपटॉप सुमारे १६ तास चालू शकतो, असा कंपनीचा दावा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय ६ई आणि ब्लूटूथ ६ यांचा समावेश आहे. हा लॅपटॉप नवीन मॅकओएस टाहो प्रणालीसह उपलब्ध होतो.
किंमतीच्या बाबतीत भारतात मॅकबुक निओची सुरुवातीची किंमत ६९ हजार ९०० रुपये ठेवण्यात आली आहे. आठ जीबी स्मृती आणि २५६ जीबी साठवण क्षमतेचा प्रकार या किमतीत मिळेल. तर ८ जीबी स्मृती आणि ५१२ जीबी साठवण असलेला प्रकार ७९ हजार ९०० रुपयांना उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलतही देण्यात आली असून शिक्षण स्टोअरमधून खरेदी केल्यास तब्बल १० हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा लॅपटॉप आणखी स्वस्तात उपलब्ध होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule