यूपीआयवरील क्रेडिट लाइनला अपेक्षित प्रतिसाद नाही
मुंबई, 06 मार्च (हिं.स.)। डिजिटल पेमेंट प्रणालीत मोठे यश मिळवलेल्या यूपीआयवर आधारित ‘कर्जरेषा’ (क्रेडिट लाइन) सुविधा सुरू होऊन जवळपास तीन वर्षे उलटली असली, तरी तिचा वापर अद्याप अत्यंत मर्यादित असल्याचे चित्र दिसून येत आहे. या कालावधीत या सुविधेद्वा
UPI credit line not responding as expected


मुंबई, 06 मार्च (हिं.स.)। डिजिटल पेमेंट प्रणालीत मोठे यश मिळवलेल्या यूपीआयवर आधारित ‘कर्जरेषा’ (क्रेडिट लाइन) सुविधा सुरू होऊन जवळपास तीन वर्षे उलटली असली, तरी तिचा वापर अद्याप अत्यंत मर्यादित असल्याचे चित्र दिसून येत आहे. या कालावधीत या सुविधेद्वारे केवळ सुमारे पाच लाख सक्रिय खाती निर्माण झाली आहेत. सहभागी बँकांकडून अपेक्षित उत्साह न दिसणे आणि ग्राहकांमध्ये या सुविधेबाबत पुरेशी जागरूकता नसणे ही या उत्पादनाच्या मर्यादित कामगिरीमागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.

या सुविधेची सुरुवात करणाऱ्या आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने अलीकडेच ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बँकेकडे या सुविधेचा सर्वाधिक सक्रिय ग्राहकवर्ग होता आणि या माध्यमातून काहीशे कोटी रुपयांचा व्यवहारप्रवाह होत असल्याचेही समोर आले होते. महिन्याला सुमारे ४० कोटी सक्रिय वापरकर्ते आणि जवळपास २१ अब्ज व्यवहार नोंदवणाऱ्या यूपीआयच्या प्रचंड यशाच्या पार्श्वभूमीवर या कर्जरेषा सुविधेचे मर्यादित यश अधिकच ठळकपणे जाणवते.

या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकने अलीकडेच लहान वित्त बँकांना त्यांच्या ग्राहकांना ही सुविधा देण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या उत्पादनाच्या विस्ताराला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यूपीआयवरील कर्जरेषा म्हणजे बँकेकडून ग्राहकाला तत्त्वतः मंजूर केलेली कर्जसुविधा असून ती PhonePe, Google Pay आणि Paytm यांसारख्या यूपीआय अॅप्समधून थेट वापरता येते. ग्राहक यूपीआयद्वारे पैसे देताना आपल्या बचत खात्याऐवजी या कर्जरेषेचा पर्याय निवडू शकतात.

पेमेंट प्रणालीचे संचालन करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून अलीकडे करण्यात आलेल्या नियामक बदलामुळे यूपीआय अॅप्सना त्यांच्या पसंतीच्या बँकांसोबत भागीदारी करून ग्राहकांना कर्जरेषा देणे शक्य झाले आहे. मात्र क्रेडिट कार्डवरील आकर्षक रिवॉर्ड्स, लहान कर्जरकमेतील कमी परतावा आणि जोखमीचे प्रमाण जास्त असणे यांसारख्या कारणांमुळे अनेक बँका या सुविधेकडे सावधपणे पाहत आहेत.

चौथ्या क्रमांकाचे यूपीआय अॅप असलेले आणि सचिन बन्सल यांच्या नेतृत्वाखालील वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म Navi हे देखील Yes Bank सोबत या नव्या प्रणालीअंतर्गत क्रेडिट सुविधा देण्यासाठी चर्चा करत आहे. 

तज्ज्ञांच्या मते, शहरी भागांपेक्षा अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागात या सुविधेला अधिक संधी आहे. विशेषतः लहान वित्त बँका आणि एनबीएफसी संस्थांचा सहभाग वाढल्यास या उत्पादनाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आर्थिक समावेशनाच्या दृष्टीने यूपीआयवरील कर्जरेषा हे आशादायक साधन ठरू शकते, मात्र त्याचा व्यापक वापर होण्यासाठी अजून काही काळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, एका वरिष्ठ बँकरच्या मते, “RBI साठी हा तातडीचा विषय नाही. वर्षभरापूर्वीही नियामक बँकांना लहान रकमेच्या तसेच असुरक्षित कर्जांवरील त्यांचा धोका कमी करण्याचा सल्ला देत होता. फिनटेक कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अनेक BNPL (Buy Now, Pay Later) कर्जांमध्ये थकबाकीचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. त्यामुळे अशा उत्पादनांना व्यापक नियामक मान्यता मिळवणे अधिक कठीण ठरते.” 
 

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande