
अकोला, 07 मार्च (हिं.स.)।
शहरातील तार फाईल परिसरात काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या प्रकरणात रामदास पेठ पोलिसांनी कारवाई करत आठ आरोपींपैकी दोन आरोपींना अटक केली आहे. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या आरोपींची पोलिसांनी परेड काढत नागरिकांमधील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, तार फाईल परिसरात जुन्या वादातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या वेळी काही जणांनी हातात लोखंडी पाईप आणि तलवारी घेऊन परिसरात फिरत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.दरम्यान, ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर रामदास पेठ पोलिसांनी तपास सुरू करत या प्रकरणातील आठ आरोपींपैकी दोन आरोपींना अटक केली आहे.आरोपींमुळे परिसरात निर्माण झालेली दहशत दूर करण्यासाठी पोलिसांनी या आरोपींची तार फाईल परिसरात परेड काढली. या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून उर्वरित आरोपींनाही लवकर अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे