
अकोला, 07 मार्च (हिं.स.)।
अकोल्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.राज्यातही तापमानाची तीव्रता वाढल्याने अंगाची लाही-लाही होत असल्याचा अनुभव विविध भागातील नागरिकांना येत आहे. मात्र यावेळी सुरवातीलाच सर्वाधिक तापमान पश्चिम विदर्भात नोंदवले जात आहे.विदर्भातील जवळपास ११ जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला आहे, तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यात ४० अंशांचा आकडा पार झाला आहे.अकोल्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.गेल्या काही दिवसांपासून येथील तापमान ३९.५ अंशांपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. आता हा पारा तब्बल ४०.8 अंशांपर्यंत पोहोचला आहे.मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान ४१ अंशांच्या जवळ पोहोचल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे.वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना त्रास होत आहे.त्यामुळे उष्माघातासारख्या आजारांचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
उन्हापासून बचावासाठी डॉक्टरांचे सल्ले..
१) शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे.
२) बाहेर पडताना टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरावी.
३)शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक.
४)लिंबूपाणी, ताक, नारळपाणी, फळांचे रस यांचे सेवन करावे.
५)हलके आणि सुती कपडे वापरावेत.
६)जास्त वेळ उन्हात काम करणे टाळावे आणि मध्ये-मध्ये सावलीत विश्रांती घ्यावी.
७)चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी किंवा ताप अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी या उपायांचे पालन करून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे