परमार्थ करताना श्रद्धा, निष्ठा आवश्यक - चेतन महाराज बोरसे
नाशिक, 07 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संत जन्माला आले , त्यांनी वारकरी संप्रदायाचा उत्कर्ष केला. संत ज्ञानोबा, संत तुकोबा, संत एकनाथ, संत निळोबा, गुरुवर्य जोग महाराज अशा संतांनी समाजाला जीवन जगण्याची कला शिकवली आणि नामाचे महत्त्व पट
Faith and loyalty are


नाशिक, 07 मार्च (हिं.स.)।

महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संत जन्माला आले , त्यांनी वारकरी संप्रदायाचा उत्कर्ष केला. संत ज्ञानोबा, संत तुकोबा, संत एकनाथ, संत निळोबा, गुरुवर्य जोग महाराज अशा संतांनी समाजाला जीवन जगण्याची कला शिकवली आणि नामाचे महत्त्व पटवून दिले. परमार्थ हा श्रद्धेने आणि निष्ठेने करावयाचा असतो असे

विचार चेतन महाराज बोरसे यांनी व्यक्त केले.

हिरावाडी येथील वरद विनायक मंदिरामध्ये वर्धापन दिनानिमित्त वै. श्री रामनाथ महाराज शिलापूरकर यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रथम दिवसाचे पुष्प गुंफताना “त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ” या अभंगावर ते बोलत होते.

परमार्थ हा श्रद्धेने आणि निष्ठेने करावयाचा असतो. त्यासाठी मन, बुद्धी आणि चित्त स्थिर असणे आवश्यक आहे. स्वतः आचरणशील राहून त्यांनी समाजाला ज्ञानाचा बोध केला. जीवनातील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ त्यांनी समजावून सांगितले. ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, भागवत, हरिपाठ असे विपुल साहित्य आपल्या समोर आहे. त्यातील विचार आपण आत्मसात केले पाहिजेत. जीवन अतिशय थोडे आहे. काही अधर्मी लोकांमुळे जीवनातील नीतीमूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. त्यामुळे संतांचा आणि ग्रंथांचा सहवास आवश्यक आहे. नामजप, ध्यानधारणा आणि तीर्थयात्रा करण्यासाठी प्रथम चित्ताची स्थिरता, तसेच मन आणि बुद्धीची एकाग्रता आवश्यक आहे. पंथ आणि वारकरी संप्रदाय यांतील फरक स्पष्ट करताना ते म्हणाले की, जोपर्यंत प्रवर्तक असतो तोपर्यंतच त्या पंथाचा उदोउदो होतो. मात्र वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानोबा, संत तुकोबा आणि त्यानंतरही अनेक संत व कीर्तनकारांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार करत त्याचा उत्कर्ष साधला आणि संप्रदाय बळकट करण्याचा प्रयत्न केला. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा या नद्यांना आध्यात्मिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांचे पावित्र्य आपण जपले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande