जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने ओझर ते पैठण दिंडीस उत्साहात प्रारंभ
Jai Babaji Devotees' Ojar to Paithan Dindis begins with enthusiasm
Jai Babaji Devotees' Ojar


चांदीच्या रथात बाबाजींची पालखी श्रीक्षेत्र पैठणच्या दिशेने रवाना

ओझर, 07 मार्च (हिं.स.)।

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने अनंत विभूषित जगदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या प्रतिवर्षी होणाऱ्या नाथषष्ठी दिंडी सोहळ्याला ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि भक्तिमय वातावरणात तब्बल ७७७ किलो वजनाच्या चांदीच्या रथातून बाबाजींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित जगदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा संपन्न होत आहे. ओझर येथील देवभूमी जनशांती धामातून दिंडी निघताच परिसरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी स्वामी परमेश्वरगिरीजी महाराज, श्रीपादानंद महाराज, हृदयानंद माऊली यांसह आश्रमीय संत व भाविक उपस्थित होते.दिंडीच्या ओझर येथील शुभारंभ सोहळ्या नंतर दिंडीचे आगमन लाखलगाव येथे झाले. येथे ग्रामस्थांनी दिंडीचे जंगी स्वागत केले. गावात बाबाजींच्या पालखीची लक्षवेधी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जगदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे व दिंडीचे पुष्पवृष्टी व ढोल-ताशांच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले.

दिंडी पुढील काही दिवस विविध तालुक्यांतून मार्गक्रमण करणार असून गावोगावी सत्संग, प्रवचन आणि भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. अखेरीस ही दिंडी श्रीक्षेत्र पैठण येथे पोहोचून संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेणार आहे. दिंडीप्रसंगी जगदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या सदगुरु भक्तीची अनेक प्रेरणादायी उदाहरणे सांगितली. प्रत्येक भाविकाने नियमितपणे एकनाथी भागवत वाचून त्याचे मनन करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आश्रमीय संत, जय बाबाजी भक्त परिवाराचे पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते. दिंडीमुळे परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande