
बीड, 07 मार्च, (हिं.स.)। आष्टा (ह. ना.) ता. आष्टी येथे महसूल विभागाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान’ कार्यक्रमाला उपस्थित राहून भाजप आमदार सुरेश धस यांनी मतदारसंघात या अभियानाचा शुभारंभ केला.
या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न तातडीने निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे. मार्च ते मे या कालावधीत मंडळ व तलाठी कार्यालय स्तरावर हे अभियान राबवले जाणार असून डिजिटल सेवांच्या माध्यमातून नागरिकांना एका दिवसात आवश्यक कागदपत्रे मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या अंतर्गत भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करून शेतकऱ्यांना सातबारा देणे, जिवंत सातबारा मोहिमेतील अर्जांची छाननी, विविध सामाजिक योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, प्रलंबित फेरफार प्रकरणे मार्गी लावणे तसेच डिजिटल ७/१२, ८-अ आणि उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन-क्रीमीलेअर यांसारखी प्रमाणपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येणार आहे.
तसेच संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, आधार अपडेट, मुलांना जन्म प्रमाणपत्र, गरोदर मातांना किट, दिव्यांगांना प्रमाणपत्र यांसारख्या सेवा नागरिकांना जवळच्या स्तरावर उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठी तालुका कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील शेतरस्ते व पानंद रस्ते खुले करण्याबाबत येणाऱ्या तक्रारी तातडीने मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, यासाठी तहसीलदार व भूमी अभिलेख विभागाने समन्वयाने काम करावे अशा सूचनाही दिल्या. शासनाचे हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशी विनंती यावेळी केली.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis