
बीड, 07 मार्च (हिं.स.)। केज मतदार संघातील दळणवळणाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील एकूण २४.५० किलोमीटर लांबीच्या दोन प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारणा केली जाणार आहे. यामध्ये धारूर, तांदळवाडी, उंदरी, कळब, अंबा आणि होळ या गावांना जोडणाऱ्या साडे नऊ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अंबाजोगाई तालुक्यातील नागापूर, साकूड ते अंबाजोगाई या १५ किलोमीटरच्या मार्गासाठी १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
राज्य महामार्ग आणि मुख्य जिल्हा मार्ग अंतर्गत होणाऱ्या या कामांमुळे ग्रामीण भागातील वाहतूक अधिक वेगवान व सुखकर होणार असून स्थानिक व्यापार आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विकासकामांसाठी आमदार मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis