परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी हालचाली वेगात; भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी
परभणी, 07 मार्च (हिं.स.)। परभणी जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्तेसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विविध पक्षांना
परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी हालचाली वेगात; भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी


परभणी, 07 मार्च (हिं.स.)। परभणी जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्तेसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विविध पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक १८ मार्च रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून संख्याबळाची जुळवाजुळव सुरू आहे. जिल्हा परिषदेत एकूण ५४ सदस्य असून सत्तास्थापनेसाठी किमान २८ सदस्यांची गरज आहे.

सध्याच्या संख्याबळानुसार भाजपकडे २४ सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १५, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे ६, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडे ५, काँग्रेसकडे ३ तर एक अपक्ष सदस्य आहे. भाजपकडे सर्वाधिक जागा असल्या तरी सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना आणखी चार सदस्यांची आवश्यकता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी नवे समीकरण मांडल्याची चर्चा सुरू आहे. या समीकरणानुसार शिंदे गटाच्या शिवसेनेला जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याची ऑफर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहील, तसेच सभापतीपदे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना आणि काँग्रेसकडे देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे १५, उद्धव ठाकरे गटाचे ६, काँग्रेसचे २ आणि एक अपक्ष असे एकूण २४ सदस्य ठाणे येथील एका हॉटेलमध्ये थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे ५ सदस्यही या आघाडीत सहभागी झाल्यास एकूण २९ सदस्यांचे संख्याबळ तयार होऊ शकते.

दरम्यान, या घडामोडींमुळे भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत जिल्हा परिषदेत सत्तेचे समीकरण कोणाच्या बाजूने झुकते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande