
परभणी, 07 मार्च (हिं.स.)।
श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे देशभरातून येणाऱ्या साईभक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी (दि.७) पाॅंडिचेरी येथील साईभक्तांच्या समूहाने पाथरी येथे येऊन साईबाबा जन्मस्थान मंदिरात अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी मंदिरात साईबाबांच्या समाधीसमोर प्रार्थना करून आपल्या मनोकामना व्यक्त केल्या. मंदिर परिसरात भक्तांनी साईनामाचा जप करत शांत व भक्तिमय वातावरणात दर्शनाचा लाभ घेतला. पांडेचेरी येथून आलेल्या साईभक्तांचे मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन येथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी भाविकांनी साईबाबांच्या जन्मभूमी पाथरीला भेट देण्याचा आनंद व्यक्त करत मंदिर व्यवस्थापनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या साईभक्तांमुळे पाथरी हे साईभक्तांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान बनत असल्याचेही त्यांनी नमूद केले.दरम्यान, साईबाबा जन्मस्थान मंदिरात दररोज देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असून पाथरी नगरीत धार्मिक वातावरण अनुभवायला मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis