
पाथरी तालुक्यातील स्थलांतरित कामगारांच्या मुलांच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने २० ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १२ गावांमध्ये विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमधून एकूण १ हजार ६६८ मुलांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली.
मसलातांडा, कानसुर, नाथरा, जवळाझुटा, बाबुलतार, टाकळगव्हाण, गुंज उमरा, पाथरगव्हाण बु., देवनांद्रा, बोरगव्हाण तसेच पाथरगव्हाण खु. या गावांमध्ये ही शिबिरे पार पडली. संकल्प संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिरामध्ये स्थलांतरित मजुरांची मुले तसेच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरांसाठी पाथरी तालुका आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टर, ए.एन.एम. व एम.पी.डब्ल्यू. कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून सहकार्य केले. वैद्यकीय पथकाने मुलांमध्ये कुपोषण, रक्ताल्पता (अॅनिमिया), डोळ्यांचे विकार तसेच विविध संसर्गजन्य आजारांची तपासणी केली. ज्या मुलांना पुढील उपचारांची गरज आहे, त्यांना तज्ज्ञांकडून आवश्यक सल्ला देण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प समन्वयक सावन जोंधळे, कार्यक्रम व्यवस्थापक विठ्ठल साळवे, समन्वयक बालासाहेब खोपे, उमेश कांबळे, शामल शेरकर, पूजा कदम व अश्विनी डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच संबंधित गावांतील सरपंच, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि गाव बाल संरक्षण समितीच्या सदस्यांनीही सहकार्य केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis