‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार जाहीर
- हिंदुस्थान समाचारचे प्रतिनिधी संदेश साळुंके यांचाही समावेश मुंबई, 07 मार्च (हिं.स.) - देशातील पत्रकारांची मोठी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्हीओएम इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय ‘पॉझिटिव्ह जर्नालिझ
पुरस्कार


- हिंदुस्थान समाचारचे प्रतिनिधी संदेश साळुंके यांचाही समावेश

मुंबई, 07 मार्च (हिं.स.) - देशातील पत्रकारांची मोठी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्हीओएम इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कारांची’ घोषणा करण्यात आली आहे. सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी राज्यभरातील १५ पत्रकारांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये हिंदुस्थान समाचारचे रायगड जिल्हा प्रतिनिधी संदेश साळुंके यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील, संचालक व संयोजक गोरक्षनाथ मदने आणि राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांनी पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली. सकारात्मक पत्रकारितेचा जागर व्हावा आणि समाजात परिवर्तन घडवणाऱ्या बातम्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून या पुरस्कारांचे आयोजन करण्यात येत आहे. राज्य शासन आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो.

या पुरस्कारांचे वितरण १५ मार्च रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे सायंकाळी ५ वाजता होणार असून राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच अमृता फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यावर्षी राज्यभरातून तब्बल ६०० प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यामधून प्रत्येक विभागातील जिल्हा आणि तालुका स्तरावरून एकूण १५ पत्रकारांची निवड करण्यात आली आहे. कोकण विभागातून कुणाल लाडे (डहाणू) व संदेश साळुंके (रायगड), विदर्भातून शाहिद पठाण (गोंदिया) व रुपेश बागड (वाशिम), पश्चिम महाराष्ट्रातून राहुल पवार (कराड) व स्वप्निल कांबळे (राधानगरी), उत्तर महाराष्ट्रातून ईश्वर महाजन (अमळनेर) व महेंद्रसिंग गिरासे (शिंदखेडा) तर मराठवाडा विभागातून भारत सवणे (परतूर) व विनोद कांबळे (लातूर) यांची निवड झाली आहे.

तसेच विशेष विंग अंतर्गत उर्दू विंगसाठी लियाकत पठाण (नाशिक), महिला विंगसाठी सारिका शिंदे (ठाणे), साप्ताहिक विंगसाठी संदीप पिंपळकर (वाशिम), रेडिओ विंगसाठी महेश जगताप (पुणे) आणि डिजिटल विंगसाठी मल्हारी ओमासे (सांगली) यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत किमान ४२ प्रभावी बातम्या किंवा लेख प्रकाशित असणे अनिवार्य होते. ७८ देशांमध्ये कार्यरत आणि सुमारे ४ लाख ७० हजार सदस्य असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेतर्फे पत्रकारांच्या कल्याणाबरोबरच सकारात्मक पत्रकारितेला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे संयोजकांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande