

रायगड, 07 मार्च, (हिं.स.)। महिलांनी आज विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र खऱ्या अर्थाने सक्षम होण्यासाठी महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे शनिवारी (दि.७) रायगड पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात ‘तेजस्विनी पुरस्कार’ वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वंदना विजय सुर्वे, देविका देवेंद्र पाबेकर, सारा अभिजित वर्तक, प्राची विवेक देवळे आणि प्रियांका अमोल घरत यांना ‘तेजस्विनी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना आँचल दलाल म्हणाल्या की, लग्नानंतर महिलेला सासरचे नाव मिळते; मात्र तिच्या आयुष्याची जडणघडण आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांमुळे होते, हे विसरून चालणार नाही. महिलांच्या प्रगतीसाठी घरातील पुरुषांची साथ अत्यंत महत्त्वाची असते. पुरुषांनी आपल्या घरातील महिलांना प्रोत्साहन दिल्यास त्या अधिक आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतात.
यावेळी रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे म्हणाल्या की, आजही समाजात महिलांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तरीदेखील महिला खंबीरपणे उभ्या राहत आहेत. पूर्वीपेक्षा आता महिलांना कुटुंबाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून कुटुंबाकडून मिळणारी मोकळीक, आत्मविश्वास आणि साथ त्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाची ठरते.
तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांनी महिलांनी आपल्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. घरातील सर्वांची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)