विजयासाठी उत्कृष्ट संघभावना महत्त्वाची – डॉ.अंभुरे
छत्रपती संभाजीनगर, 01 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा कबड्डी संघ दि. २ एप्रिल ते ६ एप्रिल २०२६ दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी उत्साहात रवाना होत आहे. जिल्ह्यातील सुमारे २०० खेळा
अ


छत्रपती संभाजीनगर, 01 एप्रिल, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा कबड्डी संघ दि. २ एप्रिल ते ६ एप्रिल २०२६ दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी उत्साहात रवाना होत आहे. जिल्ह्यातील सुमारे २०० खेळाडूंमधून या संघाची निवड करण्यात आली असून, अनुभवी व नवोदित खेळाडूंचा समतोल साधलेला हा संघ यंदा विशेष लक्षवेधी ठरत आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजीनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजय पाथ्रीकर हे होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे, डॉ. बाळासाहेब पवार, राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक डॉ. माणिक राठोड, प्रो-कबड्डी व राष्ट्रीय खेळाडू सुनील दुबिले तसेच भारतीय सैन्यात कार्यरत कबड्डी खेळाडू कृष्णा राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते खेळाडूंना कबड्डी कीट वाटप करून उत्साहवर्धन करण्यात आले.

या संघाचे कर्णधारपद गणेश चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अल्केश चव्हाण (राष्ट्रीय खेळाडू), कृष्णा पवार, राहुल टेके, समाधान ठाले, अजय ढोकळे, ओंकार वाघ, प्रशांत आव्हाड, तुषार डांगे, संदीप गायकवाड, प्रणव भूमे, निलेश लिपणे, योगेश चव्हाण, फैजान शहा आदी खेळाडूंचा समावेश आहे.

या प्रसंगी बोलताना विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विजयासाठी केवळ वैयक्तिक कौशल्य नव्हे, तर उत्कृष्ट संघभावना अत्यंत महत्त्वाची असते. एकमेकांवर विश्वास ठेवून आणि समन्वय साधून खेळल्यास कोणताही संघ सहज विजयी होऊ शकतो.” त्यांनी सर्व खेळाडूंना उत्तम कामगिरीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समारोप करताना अजय पाथ्रीकर यांनीही खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांचे मनोबल उंचावले व संघाने राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संघाला राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक डॉ. माणिक राठोड यांचे मार्गदर्शन लाभत असून, संघ व्यवस्थापक म्हणून श्री. विठ्ठल शेळके हे जबाबदारी पार पाडणार आहेत.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande