
मुंबई, 01 एप्रिल (हिं.स.) - सम्मान कॅपिटल या देशातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय बिगर-बँकिंग वित्तीय कंपनीत (NBFC) अबू धाबीस्थित इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी (IHC) समूहाने 41.5 टक्के हिस्सा घेतला असून कंपनीच्या नव्या वाढीच्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. IHC ची संलग्न कंपनी अव्हेनिर इन्व्हेस्टमेंटमार्फत ही गुंतवणूक करण्यात आली असून, या व्यवहारानंतर IHC सम्मान कॅपिटलचा प्रवर्तक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहे.
प्राधान्य वाटपाद्वारे कंपनीला सुमारे ५,६५२ कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक मिळाली आहे. पुढील १८ महिन्यांत वॉरंट्सचे रूपांतर झाल्यानंतर आणखी ३,१९८ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. खुल्या ऑफरनंतर IHC चा हिस्सा ६३.३ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
ही गुंतवणूक सम्मान कॅपिटलसाठी महत्त्वाची मानली जात असून, कंपनीला जागतिक भांडवल आणि संस्थात्मक पाठबळ मिळणार आहे.
विस्ताराची नांदी
IHC समूहाचा भाग झाल्यानंतर सम्मान कॅपिटल २०२९ पर्यंत मालमत्ता व्यवस्थापनाच्या आधारावर देशातील पहिल्या तीन NBFCमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवत आहे. कंपनी MSME, वैयक्तिक, व्यवसाय आणि सोन्यावरील कर्ज अशा विविध क्षेत्रांत विस्तार करणार आहे.
जागतिक व्यवसाय वाढीवर भर
सम्मान कॅपिटल आता IHC च्या ‘जुडान फायनान्शियल’ या जागतिक वित्तीय सेवा प्लॅटफॉर्मचा भाग होणार असून, यामुळे भारतात पर्यायी व खाजगी कर्जवितरणासाठी नवीन संधी निर्माण होणार आहेत.
अधिकृत प्रतिक्रिया
“IHC चे प्रवर्तक म्हणून स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी दीर्घकालीन भांडवल आणि जागतिक क्षमता आणते, ज्यामुळे आम्हाला जबाबदारीने आणि वेगाने विस्तार करता येईल,” असे सम्मान कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गगन बंगा यांनी सांगितले.
“भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रात विस्तार करण्याच्या आमच्या दीर्घकालीन धोरणातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. सम्मान कॅपिटलमध्ये प्रवर्तक म्हणून सहभागी होत आम्ही दीर्घकालीन मूल्यनिर्मितीबाबतची आमची वचनबद्धता अधिक दृढ करत आहोत,” असे IHC चे मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद बसर शुएब यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी