
अकोला, 11 एप्रिल (हिं.स.) : शहरातील शिवनी परिसरात २४ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अभय गवई असे मृत तरुणाचे नाव असून, अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर वार करत निर्घृणपणे हत्या केली.
घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र, या प्रकरणात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, “आपला अपमान झाला” असे सांगत आरोपी हातात चाकू घेऊन दहशत माजवत असल्याचे त्यात दिसून येत आहे.
या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. अकोला स्थानिक गुन्हे शाखेने जलद हालचाली करत अवघ्या काही तासांत आरोपींचा माग काढला.विशेष म्हणजे, आरोपी ट्रेनने पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत दोन आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे