
इम्फाल, 11 एप्रिल (हिं.स.) : मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी उग्रवाद्यांच्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाला हौतात्म्य आले. मिथुन मंडल असे या हुतात्मा जवानाचे नाव असून ते मोंगकोट चेपु परिसरात गस्त घालत असताना दुपारी 4:30 वाजेच्या सुमाराला त्यांना गोळी लागली. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने इम्फालच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी 6 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मिथून मंडल पश्चिम बंगालमधील भगजन टोला गावचे रहिवासी होते.
मुख्यमंत्री यमनाम खेमचंद सिंह यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “कॉन्स्टेबल मिथुन मंडल यांचे बलिदान अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या शौर्याचा सन्मान राखला जाईल आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. राज्य सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.” अशी ग्वाही त्यांनी दिली
फेब्रुवारी महिन्यापासून जातीय हिंसाचाराचा सामना करणाऱ्या या भागात अद्याप तणाव कायम आहे. उग्रवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांकडून सतत शोधमोहीम राबवली जात आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने 5 जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवांवरील बंदी आणखी 2 दिवसांसाठी वाढवली आहे. ही बंदी इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थौबल, ककचिंग आणि बिष्णुपूर या जिल्ह्यांमध्ये लागू राहणार आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती पसरू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच हिंगगांग पोलीस ठाणे परिसरात सुरक्षाबलांवर हल्ला आणि शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 6 तरुणांना अटक करण्यात आली आहे.-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी