राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ १३ एप्रिलला होणार प्रदर्शित; भव्य बीटीएस व्हिडिओने वाढवली उत्सुकता
मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.)। राजा शिवाजी या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून, आता ‘राजा शिवाजी अँथम’ म्हणजेच “छत्रपती” हे गाणं १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आह
Chhatrapati  The Raja Shivaji Anthem Release April 13


मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.)। राजा शिवाजी या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून, आता ‘राजा शिवाजी अँथम’ म्हणजेच “छत्रपती” हे गाणं १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत या भव्य सिनेमाच्या टीमने नुकताच या गाण्याचा बीटीएस व्हिडिओ प्रदर्शित केला असून, त्यातून चित्रपटाची भव्यता, संगीताची ताकद आणि टीमची मेहनत यांची प्रभावी झलक पाहायला मिळत आहे.

या बीटीएस व्हिडिओमध्ये प्रत्येक फ्रेममधून भव्यता आणि ऊर्जा जाणवते. विशेष म्हणजे, सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या अँथमला संगीत दिलं असून त्यांनीच ते आपल्या दमदार आवाजात सादर केलं आहे. गाण्याच्या प्रत्येक बीटमध्ये आणि प्रत्येक स्वरात हिंदवी स्वराज्याची प्रेरणा आणि शौर्याची जाणीव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दिसून येतो. याआधी गाण्याचा कोरस रिलीज करण्यात आला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता पूर्ण गाण्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन रितेश विलासराव देशमुख यांनी केलं असून त्यांनी लेखक, निर्माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत तिहेरी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या या बहुआयामी भूमिकेमुळे सिनेमाला एक वेगळीच उंची मिळणार असल्याचं मानलं जात आहे. यासोबतच संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांचा भक्कम स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

या भव्य सिनेमाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा ऐतिहासिक सिनेमा १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी इतर दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande