
* सन २०२६-२७ साठी १७४३०.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी
* मुंबईत येत्या आर्थिक वर्षात २५३८ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट
मुंबई, ११ एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सन २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पात 'म्हाडा'च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण १३०१२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी १०५८५.१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
म्हाडाचा सन २०२५-२६ या वित्तीय वर्षाकरिता सुधारित व सन २०२६-२०२७ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन २०२५-२०२६ या वित्तीय वर्षाकरिता १२३९९.२२ कोटी रुपयांच्या सुधारित व सन २०२६-२७ च्या १७४३०.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात विविध उत्पन्न गटातील २५३८ सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी ६७४७.४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कोकण मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील ५११२ सदनिकांची उभारणी करण्याचे उद्दीष्ट आहे. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी १४९७.६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पुणे मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील ६६५ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट आहे. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी ६६४.०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नागपूर मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील २००८ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी १२०६.१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील १४८३ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी २५८.३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नाशिक मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील २३७ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी १५१.५७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अमरावती मंडळाअंतर्गत विविध उत्पन्न गटातील ९६९ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी ५९.९८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
म्हाडाच्या या नव्या योजनांमुळे राज्यभरात नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे आमदार निधी /शासन निधीतुन करण्यात येणा-या कामांसाठी सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात २७११.९५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाअंतर्गत उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी तसेच पीएमजीपी, संक्रमण गाळे व पुनर्रचित इमारतींच्या दुरुस्ती व देखभाल करिता सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ६६१.७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी