
बीड, 12 एप्रिल (हिं.स.)।
अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले डॉ. मंदार उमेश दाभाडे (वय २९) यांनी अंबाजोगाईतील चनई रोड भागातील संत रोहिदास नगर येथील भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. सुरुवातीला या आत्महत्येचे कारण अस्पष्ट होते, मात्र मरण्यापूर्वी मंदार यांनी आपल्या भावाच्या मोबाईलवर पाठवलेल्या एका पासवर्डमुळे या प्रकरणातील धक्कादायक वास्तव उघड झाले असून एका महिला सहकाऱ्याच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मृत डॉक्टरच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा उलगडा अतिशय नाट्यमयरीत्या झाला असून मंदार यांनी आत्महत्येपूर्वी त्यांचे भाऊ लौकिक दाभाडे यांना त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड पाठवला होता. अंत्यविधी आटोपल्यानंतर लौकिक यांनी तो पासवर्ड वापरून मंदार यांचा मोबाईल उघडला असता, त्यामध्ये एक सविस्तर सुसाईड नोट आढळून आली. त्यात मंदार यांनी 'सॉरी पप्पा व भैया' असे म्हणत आपल्या वडिलांची आणि भावाची माफी मागितली असून स्वतःवर ओढवलेल्या प्रसंगाचे वर्णन केले आहे. त्यांच्याच एका सहकाऱ्याच्या घटस्फोटित बहिणीसोबत ( डॉ. मंदार यांची ओळख होती. तिने मंदार यांना स्वतःचे अश्लील व्हिडिओ आणि चॅट्स पाठवून शरीरसंबंधांसाठी प्रवृत्त केले होते. त्यानंतर तिने 'मी गर्भवती असून माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी विष पिऊन आत्महत्या करेन आणि सुसाईड नोटमध्ये तुझे नाव लिहीन,' अशी धमकी देत त्याला सातत्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
या धक्कादायक खुलास्यानंतर लौकिक दाभाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी आरोपी महिले विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०८ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ससाणे करत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis