
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करून आपले जीवन अधिक समृद्ध करावे. पंचशीलाच्या आचरणातून चांगले वर्तन विकसित होते आणि त्यामुळे समाजात सन्माननीय ओळख निर्माण होते. राष्ट्राची प्रगती ही समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीवर अवलंबून असते, त्यांच्या संघर्षमय प्रवासातून आणि ज्ञानार्जनाच्या तीव्र जिद्दीमधून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. त्यांची जयंती केवळ उत्सव म्हणून न साजरी करता, ती अध्ययनाचा दिवस म्हणून साजरी करावी, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले. ते क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या विद्यापीठ ग्रंथालयात आयोजित सलग १८ तास अभ्यास उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना कुलगुरू डॉ. इंद्र मणि म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी मानवकल्याणासाठी शिक्षणाला सर्वोच्च स्थान दिले. शिक्षणामुळे व्यक्ती शीलवान बनते. तसेच गौतम बुद्ध यांनी दिलेल्या पंचशील तत्त्वांचे पालन केल्यास व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. गौतम बुद्ध यांच्या तत्त्वांचे पालन जपान, थायलंड येथे प्रभावीपणे केले जाते, त्यामुळे हे देश प्रगतीपथावर आहेत; आपणही या तत्त्वांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन विभागप्रमुख डॉ. रावसाहेब भाग्यवंत, डॉ. हिराकांत काळपांडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष कदम यांनी मानले. या उपक्रमात ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis