बीड शांतीवनात ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलन उत्साहात
कवी विठ्ठल बीडकर यांच्या उपस्थितीत रंगले कविसंमेलन बीड, 12 एप्रिल (हिं.स.)। शिरूर तालुक्यातील आर्वी येथील शांतीवनात बाबा आमटे साहित्य नगरीत ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. कवी विठ्ठल बीडकर या व्यासपीठावर सायंकाळच्या सत्रात कविसं
बीड शांतीवनात ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलन उत्साहात


कवी विठ्ठल बीडकर यांच्या उपस्थितीत रंगले कविसंमेलन

बीड, 12 एप्रिल (हिं.स.)। शिरूर तालुक्यातील आर्वी येथील शांतीवनात बाबा आमटे साहित्य नगरीत ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. कवी विठ्ठल बीडकर या व्यासपीठावर सायंकाळच्या सत्रात कविसंमेलन संपन्न झाले. बालाजी मदन इंगळे यांच्या अध्यक्षतेखालील काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन जेष्ठ साहित्यिक अनंत कराड यांनी केले.

संमेलनात अध्यक्ष बालाजी इंगळे यांनी 'इराण अमेरिका युद्ध' ही कविता सादर करतांना '१५३ शाळकरी मुलींचे रक्त मिसळलेले हे पेट्रोल गाडीत भरून... कुठे चाललो आहोत आपण?' सध्याच्या भीषण युद्ध परिस्थितीवर मार्मिक भाष्य करत रसिकांना अंतर्मुख केले. पुढे नरसिंग इंगळे यांनी कोणा सांगू दुःख माझं... कोण निवारील रं दगडावनी काळीज त्यांचं... दगडावनी सरकारं..या कवितेतून शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल सरकारची उदासीनता उजागर केली. बालासाहेब झोडगे यांनी आषाढाच्या महिन्यात... आला हिरवा पाऊस माय गेली शेतात... खुरपाया पिकास ही कास्तकाराला अनुभवायला मिळणारी वाळवंटातील ओयासिसची गोष्ट विषद केली.

ही प्लॉट पडलेली शेतं... सजून बसलियत गिऱ्हाईकाची वाट बघत... एन.ए.चा टिळा लावून ही जमिनीची लक्तरं वेशीवर मांडणारी रचना प्रमोद माने यांनी पेश केली. हरिष हातवटे यांनी सजलेल्या शहरांचे... आत कुजलेले भाव ज्याला असते काळीज... त्याला म्हणतात गाव ही हिडीस शहरीकरण व गोजिऱ्या गावसंस्कृतीचं वास्तव चित्रण करणारी कविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.

सत्यप्रेम लगड व विष्णू सुरासे, दादासाहेब सादोळकरांच्या वात्रटिकांनी काव्य संमेलनात विशेष रंगत आणली. बालाजी मुंढे यांची 'आभाळ ओझं', सीमा गुंड यांची 'बाई अशीच असते', निलिमा देशमुखांची 'शब्द', काशिनाथ बिराजदारांची 'आई का दिसत नाही', चंद्रशेखर मलकमपट्टे यांची 'पारध', बाळासाहेब गर्कळांची 'अजितदादा', राजेंद्र सगरांची 'या स्वातंत्र्यात आमुच्या', वृषाली पाटीलांची 'वेदना', उषा भोसलेंची 'झुरत जाणारी माणसं', महादेव गायकवाडांची 'मायचा शोध', मनोज खुटेंची 'कुणब्याच्या पोरा', रंजना गायकवाडांची 'बालपण खास' या सर्वच कविता एकसे बढकर एक होत्या. काव्य संमेलनाचा शेवट करताना साहित्यिक अनंत कराड यांनी 'केरसूनी' या कवितेतून नव्या जुन्यातील संघर्ष रसिकांसमोर मोठ्या खुबीने मांडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande