
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)।
भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त रविवारी 19 एप्रिल रोजी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीने दिली.
या शोभायात्रेस शनिवार बाजारातील श्री रेणूकामाता मंदिर येथून सायंकाळी 5 वाजता प्रारंभ होणार असून समारोप स्टेशन रस्त्यावरील श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे होणार आहे. या शोभायात्रेत भगवान श्री परशुराम यांचा भव्य रथ आणि पालखी हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तसेच गोमाता पूजन, गोवंश संवर्धन व संरक्षण या विषयांवर सजीव देखावे सादर केले जाणार आहेत.
यासोबतच गोहत्या बंदी कायद्याबाबत जनजागृती, लाठी-काठी खेळांचे प्रात्यक्षिक, फेटाधारी महिला पथक, वैदिक गुरुकुलातील विद्यार्थ्यांकडून मंत्र व वेद पठण, पारंपरिक हलगी पथक आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांचा समावेश असणार आहे.
कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी आमरस-पुरीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव उत्साहात साजरा होत असून, या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पावन उत्सवात कुटुंबीय व मित्रपरिवारासह सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन सार्वजनिक भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis