
मुंबई, 12 एप्रिल (हिं.स.)। भारतीय टेक ब्रँड Ai+ ने आपल्या नवीन ‘नोव्हा 2’ स्मार्टफोन सिरीजचे जोरदार लाँच केले असून, या सिरीजमध्ये Ai+ नोव्हा 2, Ai+ नोव्हा 2 अल्ट्रा आणि कंपनीचा पहिला फ्लिप फोन Ai+ नोव्हा फ्लिप सादर करण्यात आला आहे. बजेट आणि मिड-रेंज ग्राहकांना लक्षात घेऊन आणलेल्या या सिरीजमध्ये मोठी बॅटरी, हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि आधुनिक डिझाइन यांचा उत्कृष्ट मेळ पाहायला मिळतो.
या सिरीजमधील डिझाइन आणि बिल्ड क्वालिटीबद्दल बोलायचे झाल्यास, Ai+ ने दोन्ही फोनना प्रीमियम लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. नोव्हा 2 मध्ये पॉलीकार्बोनेट मटेरियलचा वापर करण्यात आला असला तरी त्याची फिनिशिंग आकर्षक आहे, तर अल्ट्रा मॉडेलमध्ये अधिक स्मूद आणि प्रीमियम फील मिळतो. दोन्ही फोनचे वजन संतुलित ठेवण्यात आले असून, वापरताना ते हातात आरामदायी वाटतात.
फोनच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर्स दिले आहेत. नोव्हा 2 मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे, तर खालच्या बाजूला यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि मायक्रोफोन दिला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये सेंटर पंच-होल डिझाइनसह सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून, अल्ट्रा व्हेरिएंटमध्ये बेजल्स खूप कमी असल्यामुळे स्क्रीन-टू-बॉडी रेशो अधिक चांगला मिळतो.
तसेच नोव्हा 2 पाच रंगांमध्ये (ब्लॅक, ब्लू, ग्रीन, पिंक आणि पर्पल) येतो. तर, अल्ट्रा मॉडेल ब्लॅक, ब्लू, ग्रीन, पर्पल आणि रेड रंगात उपलब्ध असेल.
डिस्प्लेच्या बाबतीत, अल्ट्रा मॉडेलमध्ये 6.78 इंचाचा 1.5K एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 2,500 निट्स पीक ब्राइटनेससह येतो, त्यामुळे कडक उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते. दुसरीकडे, नोव्हा 2 मध्ये 6.745 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले असून तो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
परफॉर्मन्सच्या बाबतीत, नोव्हा 2 अल्ट्रा मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7400 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 4nm प्रक्रियेवर आधारित असल्यामुळे गेमिंग आणि हेवी टास्क सहज हाताळू शकतो. तर, स्टँडर्ड नोव्हा 2 मध्ये युनिसोक T8200 चिपसेट देण्यात आला आहे, जो दैनंदिन वापरासाठी योग्य आहे. दोन्ही फोन अँड्रॉइड 16 वर आधारित कंपनीच्या NxtQ ओएसवर चालतात, ज्यामुळे युजरला लेटेस्ट सॉफ्टवेअर अनुभव मिळतो.
कॅमेराच्या बाबतीत, अल्ट्रा मॉडेलमध्ये 50MP सोनी IMX752 मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, जो OIS सपोर्टसह येतो, त्यामुळे फोटो आणि व्हिडिओ अधिक स्थिर आणि स्पष्ट मिळतात. त्यासोबत 8MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर, नोव्हा 2 मध्ये 50MP सिंगल रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो सेल्फीसाठी योग्य आहे.
या सिरीजची सर्वात मोठी खासियत म्हणजे 6,000mAh ची मोठी बॅटरी आहे. नोव्हा 2 अल्ट्रा मध्ये 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे, तर स्टँडर्ड मॉडेलमध्ये 18W चार्जिंग सुविधा आहे. त्यामुळे दीर्घकाळ वापरासाठी ही सिरीज उपयुक्त ठरते.
कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5G, ड्युअल सिम, वायफाय आणि ब्लूटूथ यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. अल्ट्रा मॉडेलमध्ये वायफाय 6 आणि ब्लूटूथ 5.4 चा सपोर्ट असल्यामुळे अधिक जलद आणि स्थिर कनेक्टिव्हिटी मिळते.
किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, नोव्हा 2 ची सुरुवातीची किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे, तर नोव्हा 2 अल्ट्रा 16,999 रुपयांपासून उपलब्ध आहे. या किंमत श्रेणीत इतकी फीचर्स देणारी ही सिरीज बाजारात स्पर्धा वाढवणारी ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule