
मुंबई, 12 एप्रिल (हिं.स.)। भारतीय संगीतसृष्टीला आपल्या असामान्य आणि जादुई आवाजाने सुवर्णकाळ बहाल करणाऱ्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनाने स्वरविश्वातील एक तेजस्वी पर्व संपुष्टात आले आहे. अभी ना जाओ छोडके असे गीत गाणाऱ्या आशाताई सांगितीक विश्वाला आज स्वतःच पोरंक गेल्या. त्यांच्या जाण्याने केवळ एक महान गायिका हरपली नाही, तर सुरांच्या अजरामर विश्वाला स्वरमय करणाऱ्या युगप्रवर्तक गायिकेकडून मिळालेला भारतीय सांगीतिक संस्कृतीचा एक अमूल्य वारसा काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या शोकसंदेशात मंत्री देसाई म्हणतात की, आशाताई भोसले यांचा आवाज म्हणजे भावनांचा अथांग सागर होता. प्रत्येक गीतामधून त्यांनी आनंद, वेदना, प्रेम आणि जीवनाचे अनेक पैलू जिवंत केले. हिंदी, मराठीसह विविध भाषांमधील त्यांच्या हजारो गीतांनी अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांची गायकी ही केवळ कला नव्हती, तर ती एक अनुभूती होती, जी प्रत्येक श्रोत्याच्या मनात कायमची घर करून राहिली आहे.
आशाताई भोसले यांचा संगीतप्रवास हा संघर्ष, जिद्द आणि कलेवरील अखंड निष्ठेचा प्रेरणादायी आदर्श आहे. काळानुसार स्वतःला सतत नव्याने घडवत त्यांनी आधुनिकता आणि परंपरा यांचा अद्भुत संगम साकारला. त्यांच्या स्वरांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली. त्यातूनच अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवलेला स्वर अखेर पंचतत्वात विलीन झाला.
संगीतविश्वातील अष्टपैलू आवाज हरपला; सुवर्णयुगाला विराम – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*
शास्त्रीय संगीत असो किंवा उडत्या चालीची गाणी, प्रत्येक सुराला स्वतःच्या अनोख्या शैलीने जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतातील एक सुवर्णयुग मावळले आहे, अशा शब्दांत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले की, आशा भोसले यांनी आपल्या अष्टपैलू आवाजाने तब्बल सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या गायकीत भावनांची समृद्धता, सुरांची अचूकता आणि विविधतेचा अप्रतिम आविष्कार दिसून येत होता. त्यामुळेच त्या प्रत्येक पिढीच्या हृदयात स्थान निर्माण करू शकल्या.
त्यांनी सादर केलेल्या असंख्य गीतांनी भारतीय संगीतसृष्टीला नवी उंची दिली. पारंपरिकतेचा ठसा जपत आधुनिकतेशी साधलेला सुरेल मेळ हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या या अद्वितीय योगदानामुळे त्यांना देश-विदेशात विशेष मान्यता मिळाली, असेही त्यांनी नमूद केले.
भारतीय संगीतसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत -भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
आपल्या स्वरांनी जगाला मोहिनी घालणाऱ्या प्रख्यात अष्टपैलू गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. नऊ दशकांहून अधिक काळच्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत आशाताईंनी शास्त्रीय संगीतापासून ते पॉप गाण्यांपर्यंत प्रत्येक प्रकारात आपला वेगळा ठसा उमटवला. तब्बल २० हून अधिक भाषांमध्ये हजारो गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी गायलेली प्रत्येक रचना आजही तितकीच टवटवीत आणि उत्साहवर्धक वाटते. स्वतःची एक स्वतंत्र शैली निर्माण करून त्यांनी संगीतात आपले अढळ स्थान निर्माण केले होते.त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. जरी त्या आज आपल्यात नसल्या, तरी त्यांनी मागे ठेवलेला सुरांचा अनमोल ठेवा अनंतकाळ आपल्याला साथ देत राहील.आशाताईंच्या आत्म्यास सद्गती लाभो. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दुःखात भाजपा महाराष्ट्र परिवार सामील असून त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर